भोर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दगड, माती, झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून तालुक्यातील ६६ गावांतील १११७ लाभार्थ्यांचे सुमारे ४५७.२० हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने तालुक्यात भात, नाचणी, सोयाबीन,भुईमुग पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान भातपिकाचे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
भोर तालुक्यात १९ जुलै ते २२ जुलैदरम्यान झालेल्या पावसामुळे दुर्गम डोंगरी भागातील दगड माती झाडे झुडपे पाण्याच्या प्रवाहासह वाहत येऊन तर नदीनाल्याचे प्रवाह खाचरात आल्याने खाचरे गाडणे यामुळे दरड कोसळणे, जमीन खरडणे,नदीपात्र प्रवाह बदलणे यामुळे शेती वाहून जाणे याचे १६९.८० हेक्टरवर तर शेतात गाळ माती ३ इंचापेक्षा अधिक जमा होणे ८.५० हेक्टरचे ६६ गावांतील ६८२ हेक्टरचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अजून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जाणार आहेत.
दरम्यान, १९ ते २२ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. प्रमुख पीक असलेल्या भातपिकाचे ताली वाहून जाणे भातपीक गाळाने गाडून जाणे, पाण्याबरोबर वाहून जाणे यामुळे ६६ गावांतील १११७ शेतकऱ्यांचे सुमारे ४५७.२० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. नाचणी ११८.२० हेक्टर क्षेत्र ४३९ लाभार्थी सोयाबीन १७.८० हेक्टर ९१ लाभार्थी भुईमूग १६ हेक्टर क्षेत्र ७२ लाभार्थी अशा १९१७ लाभार्थीचे एकूण ६१९.२० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे.
भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी गावात डोंगर कोसळून तर नदीनाले ओढ्यांचे पाणी शिरून गाळाने भात खाचरे भरून पिकाचे नुकसान झालेले आहे. तर डोंगरउतारावरील नाचणी दगड मातीबरोबर वाहून गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे. खाचरात लावलेले भाताच्या पिकाचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना भाताचे पीकच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे भवितव्य तांदूळ विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. मागील दोन वर्षात दरवेळी अतिवृष्टीने नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसानभरपाई मिळण्याची वाट शेतकरी पाहत आहेत.
भातखाचरात किंवा शेतात दरडी कोसळणे जमीन खरडणे नदीपात्र किंवा ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने शेतजमीन वाहून जाणे यासाठी प्रतिहेक्टरी ३७५०० रु अनुदान आहे. तर शेतजमिनीत ३ इंचापेक्षा अधिक गाळ जमा झालेला काढणे यासाठी प्रतिहेक्टरी १२२०० रु अनुदान शासन देते. तालुक्यात १६९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यासाठी ६३६७५०० अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे.तर ८.५० हेक्टर शेतजमिनीत गाळ साचला आहे.त्यासाठी प्रतिहेक्टरी १२२०० प्रमाणे १०३७०० रु अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात वाढही होऊ शकते. तर भात, नाचणी, सोयाबीन, भुईमुग या पिकांचे ६१९.२० हेक्टरचे नुकसान झालेले असून त्यासाठी ६८०० प्रतिहेक्टरी याप्रमाणे ४२१०५६० अनुदान मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे नाहीत
भोर तालुक्यात नुकसान झालेल्या भातशेतीचे व खाचरांची पाहणी अद्याप कृषी विभागाकडून केली गेलेली नाही. फक्त अंदाज वर्तवले आहेत. मात्र प्रत्यक्ष पंचनामे कधी होणार आणि अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.