लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकाच दिवसाच्या (२० मार्च) अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २ तालुक्यांतील ७ गावांमधल्या १०७ शेतकऱ्यांचे ७३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले. रब्बी हंगामातील काढणीला आलेले व काढलेले कांदा पीक या पावसात भिजून खराब झाले. उन्हाळी खरबूज पीकही पावसाच्या तडाख्यात सापडले.
खेड व शिरूर या दोन तालुक्यांतील ७ गावांंना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. खेडमधील ४४ व शिरूरमधील ६३ असे १०७ शेतकरी बाधित झाले. त्यांचे हाती आलेले कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो हे पीक ऐन वेळच्या पावसाने खराब झाले.
शिरूर तालुक्यातील २ गावांमध्ये ४५ हेक्टरवरचा कांदा खराब झाला. खेडमधील ५ गावांमध्ये हा जोराचा पाऊस झाला. ५ हेक्टरवरील गहू नष्ट झाला. बाजरी, मका, टोमॅटो या पिकाचेही असेच नुकसान झाले आहे. सातही गावांमधील अडीच हेक्टरवरील भाजीपालाही पावसात सापडला. शिरूरमधील १३ हेक्टरवरील आंब्यांच्या कैऱ्या पावसाने थेट जमिनीवर आणल्या. उन्हाळी खरबूजाचे पीक काही जण आवर्जून घेतात. तेही पावसाने झोपवले.
कृषी खात्याचा हा प्राथमिक अंदाज आहे. महसूल तसेच कृषी खात्याने संयुक्त पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून २ हेक्टरची नुकसानभरपाई मिळते. प्राथमिक पाहणीतील हे नुकसान असले तरी अंतिम पाहणीनंतर त्यात फरक पडू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.