अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, निरगुडसर, पारगावसह बहुतांशी गावांत बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊण तास अवकाळी पाऊस पडल्याने कांदा, उस, मका, कडवळ पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात होते. काही शेतकऱ्यांकडे कांदाचाळ नसल्याने त्या शेतकऱ्यांनी कांदा शेतातच आरण लावून ठेवला होता मात्र बुधवारी सायंकाळी सहा नंतर विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्यामुळे उस, मका, कडवळ, उन्हाळी बाजरी व इतर पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच टाव्हरेवाडी येथील वीटभट्टी मालकांचेसुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे.
फोटो : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील पांडू माणिकराव हिंगे यांनी शेतात साठविलेला कांदा पावसाने भिजल्याने कांदा निवडताना महिला.