मोठ्या पावसात कोरेगावात नगर महामार्गावर पाणी साठून नेहमीच वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नव्याने हमरस्त्यापासून नदीच्या दिशेने ड्रेनेजलाइनचे काम आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. तसेच हमरस्त्यालगतही ड्रेनेजलाईनचे काम सुरु आहे. काल नगर महामार्गावर पावसाचे पाणी काही काळ साठले, मात्र या नव्या कामामुळे रात्रीच या पाण्याचा निचरा झाल्याने मोठी वाहतूककोंडी टळली.
दरम्यान, सत्यनारायण क्लॉथ सेंटर परिसर तसेच खंडोबा मंदिरासमोर घरे, दुकानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी बऱ्याच नागरिकांना अक्षरश: नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तर ढेरंगे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणी शिरून संरक्षक भिंत पूर्णत: पडल्याने वर्गखोल्यांसह सर्वत्र चिखल झाला आहे. कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी शाळेची भिंत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. या वेळी सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, भाजपचे तानाजी ढेरंगे, मुख्याध्यापक दत्तात्रय वाजे व ग्रामस्थ उपस्थित होते. फरशी ओढ्यावरील राडारोड्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने शेतीचे नुकसान झाले असल्याने त्या ठिकाणी तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा काढून पाणी वाहण्यातील अडसर दूर केला. या वेळी सरपंच अमोल गव्हाणे, संपत गव्हाणे, किरण गव्हाणे, मुकुंदा गव्हाणे आदी उपस्थित होते.
संरक्षक भिंतीला तत्काळ निधी देणार
कोरेगाव भीमा येथील ढेरंगेवस्तीवर आलेल्या पावसाच्या पाण्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत पडली असल्याने तत्काळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असून, शाळेची भिंतही खचली असल्याने त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले.
३० काेेरेगाव भीमा
कोरेगाव भीमा ढेरंगेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेची पडलेली भिंत.