वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. तर डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीरच्या फळबागांतील झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
दरवर्षीच काही ना काही आसमानी संकटे येऊन, शेतकरीवर्गाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळबागांसह, पालेभाज्या, जनावरांचा हिरवा चारा जमीनदोस्त झाला. पावसाने डाळिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ व लहान मोठ्या फळांनी बहरलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पहिल्यांदाच या भागात काही ठिकाणी आंबा पिकवला जात होता. मात्र तीन दिवसांत दोन वेळेस वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने या फळबागांना जोरदार झोडपून काढल्याने फळे तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. आडाचीवाडी परिसरात प्रामुख्याने अंजीर पिकाचे उत्पादक आहेत. अंजीराचा हंगाम मागील वर्षांपासून लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडत आहे. त्यामुळे अंजीराला उत्पादनाच्या मानाने, समाधानकारक किंमत येत नसल्याने, आगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच झालेल्या अवकाळी पाऊसाने, अनेक ठिकाणी अंजीराच्या झाडांच्या फांद्या दुफळी होऊन, तुटल्या आहेत . तसेच अंजीर पावसामुळे सडून जात आहेत.
सीताफळांचा बार अनेक झाडांना नुकताच निघाला होता. तर काही ठिकाणी झाडांना कळ्या व फळे लागली आहेत. मात्र अवकाळी पाऊस व जोरदार वा-यांने फळे तुटून पडली असून, जी फळे झाडांना शिल्लक राहिली आहेत, ती फळे फांद्याना व एकमेकांवर घासून त्यांना काळे ढाग पडल्याने, ती फळे मोठी झाल्यावर कवडीमोल भावात विकली जाण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून थोडीतरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी पवार, मधुकर पवार, अस्लम पठाण, सुनील भोसले, धनंजय पवार, ज्ञानेश्वर भुजबळ, सतीश भुजबळ आदी शेतक-यांनी केली आहे.
२७ वाल्हे
मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी रात्रं-दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली.
===Photopath===
270521\27pun_11_27052021_6.jpg
===Caption===
२७ वाल्हे मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी राञ -दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमिनदोस्त झालीत.