काळदरी परिसरात लागलेल्या वणव्यात शेतीचे व वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. वणवा लावणाऱ्या लोकांवर सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जोपर्यंत या दोषींवर कठोर कारवाई करुन नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी सरपंच गणेश जगताप यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता काळदरी परिसरामध्ये कोठेही नवीन वनक्षेत्र तयार झाले नाही याचा विचार केला असता वन विभागाचा नाकर्तेपणा समोर आला असून, परिसरात कोठेही जाळशेषा काढल्या नाहीत. वन क्षेत्रालगत असलेल्या शेत जमिनींचे वणव्यात नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नसल्याचे जगताप यांनी सांगितले.
काळदरी मध्ये लागलेल्या वणव्यात फळबागा, उभी पिके, साठवलेला चारा भस्मसात झाला असून हातातोंडाशी आलेल्या फळबागा व ठिबक संच जळाल्याने शेतकऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बहिरवाडी, परिसरातील वन क्षेत्राला वणव्याच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसल्या आहेत.'एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष' या योजनेचा गाजा वाजा करून वन विभागाने झाडे लावली असली तरी या झाडांचे संगोपन व रक्षण करण्यात वन विभागाला अपयश आले असल्याचेेेे बहिरवाडीचे सरपंच दशरथ जानकर म्हणाले आहेत.
वन वाचवण्यासाठी वेळोवेळी गावपातळीवर जागृती करुनसुध्दा शेतकरी बांध पेटवतात तेथून खरी वणव्याला सुरवात होते. वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करणार असून, या आरोपींविरुद्ध तक्रार देण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन पुरंदरच्या वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप यांनी केले आहे.
काळदरी (ता. पुरंदर) येथे वणव्यात फळबागा व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आहेत.