पाटेठाण: येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने रसायनमिश्रित पाणी मुळा-मुठा नदीत सोडले. त्यानंतर तेच पाणी राहू येथील शेतकऱ्याने शेततळ्यास साठवून त्याचा पिकांसाठी वापर केल्याने डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. तर शेततळ्यातील मासेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्याने रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात न सोडण्याबरोबर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
राहू येथील रणजित देशमुख यांचे येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यानजीकच शेतीक्षेत्र आहे. शेतात त्यांनी दोन शेततळी तयार केली असून, त्यामध्ये मुळा-मुठा नदीवरुन कृषी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणीउपसा करत उसाला, फळबागांना पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात वीजबिल वसुली कालावधीत अनेक विद्युत पंप बंद होते. परंतु देशमुख यांचे विद्युत मोटारी चालू असताना कारखान्यातून नदीपात्रात सोडलेले रसायनमिश्रित पाणी पाणी विद्युतपंपातून शेततळ्यात आले. त्यामुळे शेततळ्यातील मासे मृत पावले आहेत. त्याचबरेाबर या पाण्याचा वापर शेतीला देखील करण्यात आला होता. त्यामुळे डाळींब बागांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर इतर पिकांना देखील फटका बसला आहे.
यासंदर्भात बोलताना रणजित देशमुख म्हणाले, संपूर्ण शेततळ्यातील पाण्यावर रसायनमिश्रित पाण्याचा तवंग तयार झाला असून तळ्यातील सगळेच मासे मृत्यू पावले आहेत. डाळिंब बागांना देखील याच शेततळ्यातील पाण्याचा वापर झाल्याने बागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारखान्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कारखाना व्यवस्थापनाकडून नदीत तसेच परिसरात कुठेही रसायनमिश्रित पाणी सोडले जात नसून प्रयोगशाळेत चाचणी घेऊन त्यातील एन.पी.के ची तपासणी करून पूर्ण प्रक्रियायुक्त हे पाणी असून ते रसायनमिश्रित नाही. येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. - प्रकाश मते सरव्यवस्थापक, श्रीनाथ म्हसकोबा कारखाना पाटेठाण.
२५ पाटेठाण