पुणे : अवकाळीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ तालुक्यांतील ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात १०२ हेक्टरवरील फळपिके, ३७५ हेक्टरवरील बागायती तर जिरायती पिकांखालील १.२ हेक्टरवरील नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे. या अवकाळी पावसामुळे १ हजार २२१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शनिवारी पडलेल्या पावसामुळे ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान आंबेगाव तालुक्यात झाले असून त्यात बागायती क्षेत्राचेच नुकसान झाले आहे. हे क्षेत्र २५२.७० हेक्टर इतके आहे. शनिवारी दुपारपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातींल तालुक्यांत विशेषकरून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. बागायती पिकांना मोठी झळ पोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यात नुकसान झाले असून येथील कांदा, भाजीपाला, गहू, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात बागायती क्षेत्र ७६ हेक्टर असून फळपिकांखालील ९८ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पुंरदर तालुक्यातील गहू व कलिंगडाचे नुकसान झाले असून नुकसानीचे क्षेत्र २३.५० हेक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यात १८, मुळशी तालुक्यात ५.५०, हवेलीत ३.२० व मावळ तालुक्यात १.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय शेतकरीपुरंदर ७५, जुन्नर ३१३, शिरूर २५, आंबेगाव ७३०, हवेली ४२, मावळ १०, मुळशी २६ एकूण १२२६गावांची संख्या पुंरदर ७, जुन्नर ८, शिरूर १, आंबेगाव ५, हवेली २, मावळ १, मुळशी १९ एकूण ४३
अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. कृषी सेवकांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. आता कर्मचाऱ्यांचा संप महसूल व कृषी विभाग एकत्रित पंचनामे वेगाने करतील.- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी