पुणे : जिल्ह्यात गेल्या २५ व २६ नोव्हेंबर रोजी झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या १३ तालुक्यांतील सुमारे ७ हजार ८६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापोटी ११ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या अवकाळी पावसाचा फटका ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना बसला आहे.
जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब यासारख्या फळपिकांसह भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होेते. त्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. हे पंचनामे आता पूर्ण झाले असून ११ तालुक्यांतील ७ हजार ८३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार या अवकाळी पावसाचा फटका ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना बसला आहे.
सरकारी निकषांनुसार, शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी हेक्टरी १ हजार, बागायती पिकांसाठी २ हजार, तर फळपिकांसाठी अडीच हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. या अहवालात शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख ७७ हजारांची मदत मिळावी, असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल आता कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या अहवालानुसार, ३ हजार ३३२.५३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, २ हजार ९८४.४५ हेक्टरवरील बागायती पिकांचे, १ हजार ५४७.११ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.
तालुका गावे क्षेत्र (हेक्टर) नुकसानीची रक्कम
भोर ६५.७--५५८६२०
मुळशी १४१.०३--११९८७५५
मावळ १३६--११५६०००
हवेली ७८.३७--६७२१७०
वेल्हा ४२.२५--३५९१२५
आंबेगाव ३१६०.५१--४०७७९४२५
जुन्नर १०५८.५१--१७०६४७०५
शिरूर २२७१.६५--३५२११२५
खेड ३२७.२८--३८३७४२५
बारामती ५०१.१०--११२०९८५०
इंदापूर ८१.२९--१८२९०२५
एकूण ७८३७--११३८७६६२५
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार महसूल व कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले आहेत. हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात येईल.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.