- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : सध्या काेराेना लाट ओसरलेली आहे आणि लसीकरणही थंडावलेले आहे. परंतु, काेविडबाबत निश्चित अंदाज बांधता न येणारा ताे व्हायरस आहे. त्यातच काेराेनापश्चात अनेकांना विविध प्रकारचे त्रासही जाणवत असून, त्यासाठी स्पेशल ओपीडीची मागणीही केली जात आहे. याबाबत भारतीय वैद्यकीय संशाेधन परिषदेच्या संसर्गजन्य राेग विभागाचे माजी विभाग प्रमुख, वरिष्ठ संसर्गराेगतज्ज्ञ डाॅ. रमण गंगाखेडकर यांच्याशी ‘लाेकमत’ने संवाद साधला असता त्यांनी काेराेना, लसीकरण, चाैथी लाट याबाबत त्यांची शास्त्रीय मते व्यक्त केली.
लाँग काेविडचा परिणाम किती दिवस दिसेल?
काेविडचे परिणाम तात्पुरते आणि वर्षानुवर्षे राहणारे असे आहेत. तात्पुरत्यामध्ये केस जाताहेत, काेणाला दम लागताे व इतर आहेत. हा व्हायरस (विषाणू) फार चांगला नाही. आपल्या शरीरातल्या काेणत्या अवयवाला जास्त नुकसान केलेय हे आता नाही कळणार.. हे चार ते पाच वर्षांनंतर किंवा एकदम अचानक दिसायला लागेल. म्हणून लाँग काेविडच्या पेशंटनी फाॅलाेअप ठेवून उपचार घेणे गरजेचे आहे. काेविड काळात डायबेटिस वाढला. कारण स्वादुपिंडाला इन्फेक्शन झाले हाेते. यालाही ‘लाँग काेविड’ असे म्हणावे लागेल. मग, हा पुढे आणखी काेणत्या अवयवाला नुकसान करताेय हे पाहावे लागेल.
लाँग काेविडची स्पेशल ओपीडी सुरू करावी का?
लाँग काेविड ओपीडीपेक्षा लाेकांना लाँग काेविड म्हणजे काय व त्याची लक्षणे काय हे सांगायला हवे. कारण, केवळ ओपीडी उघडून फायदा नाही. लाेक तेथे गेले पाहिजेत. लाेक टेस्ट करायला येत नाहीत मग फाॅलाेअपसाठी येतील का, हा प्रश्न आहे. जर हार्ट अटॅक येणार आहे तर ताे हृदयविकारतज्ज्ञाकडे जाईलच.
हृदयविकाराचे प्रमाण वाढले का?
काेराेनापश्चात हृदयविकारांचे प्रमाण वाढले आहे; पण हे सर्वसामान्य मत झाले. याला भरपूर पुरावे नाहीत. वरकरणी भारतात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, हृदयविकार व काेराेना यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी अभ्यास करावा लागेल.
तिसरा डाेस घ्यावा का?
तिसरा डाेस घ्यावा कारण व्हायरसचे हे म्युटेशन हाेत आहे. व्हायरस म्युटेट होताे कारण आपल्याकडे औषधाचे प्रेशर असते त्यामुळे त्याला जगायला त्रास हाेताे किंवा आपली प्रतिकारशक्तीचे प्रेशर त्या व्हायरसवर पडते. प्रतिकारशक्ती ही संसर्ग किंवा लसीने मिळते. जगात एमआरएनए व व्हायरसच्या स्पाइक प्राेटीनवर आधारित लस आहेत. स्पाइक प्राेटीनचा वापर हा विषाणूला शरीरातील पेशीत प्रवेश करण्यासाठी हाेताे. त्यामुळे ताे व्हायरस बदलत आहे. ताे बदलताे कारण त्याला जगायचंय त्याला लस शरीराच्या आत येऊ द्यायला तयार नाही. तर ताे म्युटेशन करून त्याचे स्पाइक प्राेटीन बदलून ताे शिरताे.
रुग्णसंख्या कमी झाल्याने काेराेना प्रतिबंधक लसीकरण थांबवावे का?
थांबवले तरी चालेल; परंतु गरीब लाेक घेणार नाहीत. कारण समाजातील बऱ्याच माेठ्या प्रमाणात लाेकांना घेणे परवडणारे नाही. तसेच जाेपर्यंत नवीन व्हेरिएंट येत नाही ताेपर्यंत तरी चाैथा डाेस घ्यावा लागेल किंवा लसीमध्ये बदल करावा लागेल, असे वाटत नाही.
चाैथी काेराेना लाट येऊ शकते का?
ओमिक्राॅनमुळे सध्या लक्षणे सामान्य आहेत व त्याची तीव्रताही कमी आहे. म्हणून आणखी एखादी लाट आली तरी ती डिटेक्ट हाेणार नाही. कारण टेस्ट केली नाही तर ती दिसणारही नाही.
आणखी नवीन व्हेरिएंट येईल का?
पूर्वी दर सहा महिन्यांनी एक नवीन व्हेरिएंट यायचा. आताचे व्हेरिएंट येतात ते सर्व ओमिक्राॅनच्या फॅमिलीचे आहेत. म्हणजेच दाेन ओमिक्राॅनचे व्हेरिएंट एकत्र येऊन वेगळाच व्हेरिएंट तयार झाला आहे. आता जवळ - जवळ वर्ष हाेऊन गेले तरी नवीन व्हेरिएंट नाही. लसीकरणामुळे विषाणू बदलताेय. परिणामी, नवीन विषाणू एका माणसाकडून दुसऱ्याकडे जाण्याची म्हणजे संसर्गाची क्षमता खूप जास्त आहे. तरीही आता अशा परिस्थितीत नवीन व्हेरिएंट येण्याची शक्यता नाही.
ओमिक्राॅनचेच उपप्रकार का सध्या येतायेत?
ओमिक्राॅनचे ३७ म्युटेशन झाले व ताे वेगळ्या गटातील आहे. पूर्वीचे व्हायरस आले ते वेगळ्या गटातील हाेते. हा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लाेकांमध्ये राहून उत्क्रांत झालेला आहे, अशी थिअरी आहे. दुसऱ्या थिअरीनुसार आधी माणसांत आला व ताे तेथून प्राण्यांमध्ये व प्राण्यांतून परत माणसांमध्ये आला असे म्हटले जाते. यालाच रिव्हरर्स झुनाॅसिस असे म्हणतात.