इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील कृषीपंपांचा वीजपुरवठा दोन तासांवरून चार तासांपर्यंत वाढवण्यास पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली असली, तरी त्याबाबत धरणग्रस्त असमाधानी आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत धरणग्रस्त व अधिकाऱ्यांची विशेष बैठक येत्या बुधवारी (दि. १३) मुंबईत घेण्यात येणार आहे. या बैठकीस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे व उजनी धरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली. शासनाने पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांवरून दोन तासांवर आणण्याचा निर्णय घेतला. धरणग्रस्तांसाठी अन्यायकारक असणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी लोकांची अपेक्षा आहे. ही वस्तुस्थिती शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्याचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याशी संपर्क साधला. पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांच्या विद्युत पुरवठ्याचा कालावधी वाढवण्याची सूचना पवार यांनी दिली. त्यानुसार शेतीपंपांना चार तास वीजपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी दिली. मात्र, चार तासांचा वीजपुरवठा पुरेसा नाही. शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. त्यामुळे किमान आठ तास वीज मिळावी, अशी विनंती शिष्टमंडळाने पवार यांना केली. त्यावर पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, महसूल विभाग, महावितरण विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग व धरणग्रस्तांच्यासमवेत या विषयावर मुंबईमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
उजनीच्या वीजपुरवठ्याबाबत धरणग्रस्त असमाधानी
By admin | Published: April 10, 2016 4:03 AM