टाकळी हाजी : खेड परिसरातील प्रस्तावित विमानतळ रद्द झाल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी केली.मलठण (ता. शिरूर) येथे नळ पाणीपुरवठा, तसेच आमदाबाद फाटा, टाकळी हाजी रस्ता, मलठण ते वाघाळे रस्ता या विकासकामांचे भूमिपूजन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले.या वेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील जनतेमधे सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून, तरुणवर्ग अस्वस्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता न झाल्यामुळे सरकारविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते हे होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, सविता बगाटे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सविता पºहाड, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपविभागीय अभियंता प्रभाकर जाधव, सरपंच कैलास कोळपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार कार्यक्षम असल्यानंतर किती विकासाची कामे मार्गी लावता येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ आहे. खेडच्या जनतेनेही कार्यक्षम खासदारांना निवडून द्यावे, असे आवाहन विश्वास देवकाते यांनी केले.शेतकरी कर्जमाफी फसवी निघाली...सध्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकरी शेतमाल फेकून देत आहेत. शासनाची कर्जमाफी तर फसवी व दिशाभूल करणारी ठरली. आता उत्पादनखर्चसुद्धा परत मिळण्याची शक्यता नाही. शासनाचे धोरण हे शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी नाही, तर कर्जबाजारी करणारे असल्याची टीका माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतया वेळी मलठणचे सरपंच कैलास कोळपे, माजी सरपंच अनिता लकडे, सुरेश गायकवाड, मुकुंद नरवडे, उत्तम लकडे, यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:58 AM