लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर पंचायत समितीच्या सभापतीच्या नाट्यमयरित्या झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी कारी गणातील पंचायत समिती सदस्या दमयंती पर्वती जाधव यांची बहुमताने निवड झाली आहे. पक्ष आदेश धुडकावून व्हीप काढलेल्या उमेदवाराला नाकारात दमयंती जाधव यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे.
पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांची सव्वा वर्षाची मुदत संपल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे दिला तो मंजूर झाल्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयातून भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक लागली होती. गुरूवारी पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी तर सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी काम पाहिले.
सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाच्या वतीने पक्षादेश,(व्हिप) काढून लहुनाना शेलार यांचे नाव जाहीर केले होते. त्यांना मतदान करण्याचा आदेशाचे पालन करण्याच्या सूचना व्हिप मध्ये दिल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्जावर लहुनाना लहु शेलार यांना मंगल बोडके सूचक झाल्या तर पक्षादेश डावलून सभागृहात अचानक आघाडी होऊन काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य श्रीधर किंद्रे व दमयंती जाधव यांनी एकत्र येऊन दमयंती जाधव यांचा सभापतिपदासाठी अर्ज भराला त्याला सूचक श्रीधर किंद्रे झाले तर शिवसेना सदस्या पूनम पांगारे यांनी सभापतिपदासाठी अर्ज भरला. त्यांना काँग्रेसचे सदस्य रोहन बाठे सूचक झाले.
सभागृहात सभापतिपदासाठी हातवर मतदान करून घेण्यात आले. यात दमयंती जाधव यांना सर्वच्या सर्व ६ मते मिळाली आणि सभापतिपदी बहुमताने त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे, शेलार व पांगारे यांनी सुध्दा दमयंती जाधव यांनाच मतदान केले. त्यामुळे लहू शेलार आणि पूनम पांगारे यांना शून्य मते मिळाली.
भोर पंचायत समितीच्या उपसभापती कोण ?
दमयंती जाधव सध्या पंचायत समितीच्या उपसभापती आहेत. त्या सभापती झाल्याने उपसभापतिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे नवीन उपसभापती निवडला जाणार आहे. या पदासाठी वेळू गणातील शिवसेना सदस्या पूनम पांगारे व भोंगवली गणातील काँग्रेसचे सदस्य रोहन बाठे दोनजण इच्छुक आहेत. मात्र, अचानक झालेल्या महाविकास आघाडीत कोन्ही कुणाला काय आश्वासन दिलेले आहे आणि ते प्रत्यक्षात
पाळणार का? सभापतिपदाप्रमाणे ऐनवेळी दुसराच होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
चौकट
सभापतिपदावरून राष्ट्रवादीत सलग तिसऱ्यांदा बंडाळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सभापतिपदावरुन २००२ साली सभापतिपदासाठी मानसिंग धुमाळ यांचे नाव पक्षाकडून आले होते. त्यावेळी पक्षादेश डावलून कृष्णाजी रांजणे यांनी अर्ज भरून सभापती झाले. तर २००७ साली पक्षाकडून रणजीत शिवतरे यांचे नाव आले होते. त्यावेळी संतोष घोरपडे सभापती झाले. आज लहू शेलार यांचे नाव सभापतिपदासाठी पक्षाने
पाठवले असताना पक्षादेश डावलून दमयंती जाधव यांनी अर्ज भरुन सभापती झाल्या आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीत बंडाळी झाली आहे. पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे दरवेळी बंडाळी वाढत चालली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी माझे नाव पाठवले होते. पक्षादेश (व्हिप) आपल्या नावाचा काढला होता. मात्र, सभागृहात पक्षादेश डावलून सभापतिपदासाठी दमयंती जाधव यांनी अर्ज भरला परिणामी पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून मंगल बोडके आणी मी आमची दोन मते दमयंती जाधव यांना दिली असल्याचे पंचायत समिती सदस्य लहू शेलार यांनी सांगितले.
- भोर पंचायत समितीच्या सभापतीपदी दमयंती जाधव यांच्यासह इतर सदस्य.