पुणे : अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांना आफ्रिकेचे महत्त्व समजले आहे आणि म्हणूनच आज अमेरिका आफ्रिकन देशांबरोबर शिखर परिषदांचे आयोजन करीत आहे. भारताला जागतिक महासत्ता बनायचे असेल तर त्यासाठी आफ्रिकेसोबत सर्व क्षेत्रात भागीदारी वाढवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डम्मू रवी यांनी व्यक्त केले.
सिम्बॉयोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातर्फे आठव्या आंतरराष्ट्रीय सहयाेग परिषदेचे आयोजन दि. २० व २१ जानेवारी रोजी सिम्बाॅयोसिसच्या लवळे येथील कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये रवी बाेलत हाेते. या परिषदेचा मुख्य विषय ‘भारत आणि आफ्रिका : जुने भागीदार, नवीन आव्हाने आणि संधी’ असा आहे.
परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या समारंभासाठी डम्मू रवी हे प्रमुख अतिथी, तर अध्यक्षस्थानी सिम्बॉयोसिस कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार होते. तसेच सिम्बॉयोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या संचालिका प्रा. शिवली लवळे, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते उपस्थित हाेते.