पुणे: मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, त्यांची अवस्था अंत्यंत नाजूक आहे. असे असताना एक उपमुख्यामंत्री आजाराचा बहाणा करून घरात बसून आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराचे दौरे करत आहेत. आणि या सरकारचे मंत्री कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले आहे याचे सरकारला गांभीर्य नाही. त्यामुळे आम्ही या प्रकारचा कार्यक्रम होऊ देणार नाही. एक मराठा, लाख मराठा, मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या फडणवीसांचा धिक्कार असो... आरक्षणात अडथळा आणणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो... या प्रकारच्या घोषणा देत उदय सामंत याचे डीपी रोडवर लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले.
आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी कार्यक्रमांतर्गत १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन वंचित विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हस्ते होणार होते. नेत्यांना आणि मंत्र्यांना गावबंदी असताना सामंत कार्यक्रम कसे करू शकतात? असा प्रश्न घेऊन काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना विरोध करण्यासाठी तसेच त्यांचा निषेध करण्यासाठी जमले व कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
उदय सामंत काही कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आलेल्या आंदोलनकर्त्यांकडून डीपी रोडवरील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फ्लेक्स फाडण्यात आले. फ्लेक्स पायदळी तुडवण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्कच नाही कोनाच्या बापाचे..., कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवय राहणार नाही... , जरांगे पाटील आगे बडो, हम तुम्हारे साथ है... जय भवानी, जय शिवाजी... या घोषणाही देण्यात आल्या.