टाकळी हाजी : शिरूरच्या बेट भागातून वाहणारी व शिरूर, पारनेरमधील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी नदीवरील होनेवाडी, कुंड परिसरातील बंधारा मागील २० दिवसांपासून कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीत असणारी कांदा, ऊस, भुईमूग, डाळिंब, जनावरांचा चारापिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षभरात अडचणींचा सामना करणारे या भागातील शेतकरी आता नदीत पाणीच नसल्याच्या संकटाने हवालदिल झाले आहेत.
काही दिवसांपासून उन्हाळ्याची चाहून लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोतही झपाट्याने खालावत चालले आहेत. मागील वर्षभरात संकटाना तोंड देत, शेती पिकविणाऱ्या, जगविणाऱ्या शेतकऱ्यांना आता हाताशी आलेली पिके पाण्याअभावी जातात कि काय? अशी धास्ती लागली आहे.
दरम्यान कुकडी नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतीला तसेच पिण्यासाठी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री व या भागाचे विधानसभा सदस्य मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली. त्यामुळे कुकडी नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतीला भर उन्हाळ्यात पाणी मिळणार असल्याने मोठाच दिलासा मिळणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.
कुकडी कालव्याला पाणी सुरू असूनसुद्धा नदीला पाणी सोडण्यात विलंब झाल्यामुळे शेतमाल जळून चालला असून, शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल झालेले शेतकरी नाेटाबंदी जीएसटी कोरोनामुळे कर्जबाजारी होऊ लागले असून सरकारची अवस्था म्हणजे पावसाने झोडपले व राजाने मारले तर न्याय मागावा कुणाकडे, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
सध्या कुकडी डाव्या कालव्यास आवर्तन सुरू आहे. होनेवाडी, कुंड गाडीलगाव परिसरातील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहे. त्यामुळे पिकेही पाण्याअभावी जळून जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये लवकरात लवकर पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रशांत कडुसकर, मुख्य अभियंता, कुकडी प्रकल्प
०५ टाकळी हाजी