भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणातून फलटण व बारामती तालुक्यातील शेतीसाठी सोडलेले पाणी नीरा देवघर धरणग्रस्तांच्या मागण्या मंजूर न झाल्याने धरणग्रस्तांनी शुक्रवारी धरणावर जाऊन सोडलेले पाणी पुन्हा बंद केले. वीर धरणातून बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्याला शेतीसाठी एक एप्रिलपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र धरणात सध्या फक्त ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीला कमी पडत असल्याने नीरा देवघर धरणातून काल रात्री ९ वाजता ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले होते. सुमारे एक टक्का पाणी खाली गेले. मात्र पाणी खाली सोडलेले समजताच आज सकाळी १०.३० वाजता नीरा देवघर धरणग्रस्तांनी जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पाणी खाली जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत पाणी बंद केले आहे.- नीरा देवघर धरणाचे काम पूर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवले त्याला १० वर्षे झाली. मात्र अद्याप भोर तालुक्यातील ना कालवे पूर्ण आहेत, ना उपसा जलसिंचन योजना ना पुनर्वसन. कोणतीच कामे झाली नाहीत, त्यामुळे अडीच महिन्यांपूर्वी सोडलेले पाणी धरणग्रस्तांनी बंद केले होते. तरीही धरणग्रस्तांच्या मागण्या तशाच आहेत. त्यामुळे पुन्हा पाणी बंद करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.
धरणग्रस्तांनी पुन्हा पाणी केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 2:42 AM