पुणे: बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा जन्मदिवस २९ एप्रिल हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या सहयोगाने मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दोन दिवसीय नृत्याची कार्यशाळा बाणेर येथे आयोजित केली होती. प्रत्यक्ष नटरंग फेम सोनालीकडून नृत्याचे धडे घेणे हा तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचा विषय होता.या कार्यशाळेत पुण्यातील विद्यार्थ्यांबरोबरच मुंबईतील नृत्यप्रशिक्षणार्थी तसेच गृहिणींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. नृत्य हा एक अभ्यासक्रम, व्यायामप्रकार किंवा व्यावसायिक विषय नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी ऊर्जेचा नवा स्रोत आहे. शरीराने तंदुरुस्त असणाऱ्या प्रशिक्षणार्थीं- बरोबरच गतिमंद मुलांनाही नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी नवक्षितिज संस्थेतील विद्यार्थ्यांचे नृत्य या कार्यशाळेच्या शेवटच्या पर्वात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर नृत्य करताना होणारा आनंद अवर्णनीय होता.उपस्थितांनी टाळ्या व शिट्यांच्या गजरात विशेष मुलांचे कौतुक केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनीही नृत्य सादर करून आपले नृत्यप्रावीण्य दाखविले. नृत्य करण्यास कोणतीच वयोमर्यादा नसते हे या कार्यशाळेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात सहभागी गृहिणी यशस्वी ठरल्या. यादरम्यान सोनालीने उपस्थितांना नृत्यविषयकटिप्सही दिल्या.नृत्यप्रशिक्षण हा आयुष्यभराचा प्रवास आहे व तो अखंड चालू ठेवला पाहिजे. चाहत्यांच्या आग्रहाखातर अशा कार्यशाळा राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्याचा मानस आहे.- सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णीने दिले नृत्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:36 AM