पुणे : तीन राज्यांतील पक्षाचा विजय काँग्रेस भवनामध्ये मंगळवारी दुपारी नाचगाणी व भाषणे करून साजरा करण्यात आला. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेस भवनात येऊन शहराध्यक्षांचे स्वागत केले. दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी या वेळी जातीयवादाच्या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त केला व २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाची ही नांदी असल्याचे मत व्यक्त केले.निवडणुकीतील सततच्या अपयशाने खचलेल्या काँग्रेस पक्षात मंगळवारी मात्र देशाच्या तीन राज्यांतील विजयाची लाट उसळली होती. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे दिवसभर काँग्रेस भवनामध्ये ठाण मांडून होते. विजयाच्या बातम्या येऊ लागल्या तसेच काँग्रेस भवन गजबजू लागले. पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी काँग्रेस भवनात जमू लागले. काही जणांना ध्वनिवर्धक लावून त्यावरील गाण्यांवर ताल धरला. त्यात बागवे यांच्यासह माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, सोनाली मारणे, अविनाश बागवे, लता राजगुरू, नीता रजपूत, अजित दरेकर, प्रकाश पवार व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाचण्यात सहभागी झाले.बागवे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी घेतलेल्या कष्टाला या विजयाचे श्रेय द्यायला हवे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असतानाच पक्षाला हा विजय मिळाला आहे. मोदींच खोटे बोलतात, भाजपा खोटे बोलतो आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या आधारावर देश काबीज करण्याचा त्यांचा डाव प्रगल्भ भारतीय मतदार असाच उधळून लावतील.’’ माजी आमदार जोशी म्हणाले, ‘‘काँग्रेससाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. गांधी कुुटंबांवर केलेली निरर्गल टीका सहन केली जाणार नाही, हेच तीन राज्यांतील मतदारांनी भाजपाला ठणकावून सांगितले आहे. धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या भाजपाचा प्रतिकार काँग्रेस व मित्र पक्ष संसदीय मार्गाने असाच करीत राहतील.’’काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे काही नगरसेवक, कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस भवनामध्ये आले. त्यांनी पेढा भरवून बागवे यांचे स्वागत केले व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तीन राज्यांतील जनतेचे भाजपाला नाकारले आहे. आता त्याचा खोटेपणा देशाच्या अन्य राज्यांतील जनतेलाही समजले. महापालिकेच्या निवडणुकीपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या जातीयवादाच्या विरोधात लढत आहे. यापुढेही हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धार बागवे व तुपे यांनी व्यक्त केला.लोकसभेच्या जागेसाठी राष्टÑवादीकडून जवळीक...सलग दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे काँग्रेस भवनात येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावलीच; शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा गोतावळा एकच असल्याचे वक्तव्य केले.त्याआधी खुद्द शरद पवार यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहून यापुढे हातात हात घालूनच काम करावे लागेल, असे म्हटले होते. हे राजकीय गूळपीठ आता पुण्यात चर्चेचा विषय झाला असून, लोकसभेच्या पुण्याच्या जागेवर डोळा ठेवून तर हे सगळे चाललेले नाही ना, असा संशय काँग्रेसजनांकडून व्यक्त होतो आहे.
काँग्रेस भवनात नाच, गाणी आणि भाषणेही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:25 AM