पुणे : गर्भवती महिला भोसरी महानगरपालिकेच्या रुग्णालयातून प्रसुतीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रसुतीगृहात दाखल झाली होती. महिलेच्या अंगावरून चार तासांपासून गर्भजलाचे पाणी जात होते. प्रवेशाच्या वेळी तिची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली होती. म्हणून आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. तिने २३ जुलै रोजी दुपारी दोन वाजता बाळाला जन्म झाला. प्रसुतीनंतर तिची गर्भपिशवी उलटी होऊन योनीमार्गातून बाहेर आली. त्यामुळे अचानक हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब कमी झाल्याने महिलेवर तात्काळ उपचार सुरू झाले आणि गर्भपिशवी पूर्ववत बसवण्यात आली. गर्भाशय सामान्य स्थितीत आले. जागरूक देखरेख, त्वरित निदान, गर्भाशयाच्या त्वरित पुनर्स्थापनेमुळे धोका टळला आणि कमी रक्तस्त्राव झाला. गर्भाशय चांगल्या स्थितीत राहिले. डॉक्टर रुग्णाचे सतत निरीक्षण व तपासणी करत होते. महिलेला कोणत्याही रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासली नाही.
गर्भावस्थेत केलेल्या सोनोग्राफीमुळे बाळाची वार गर्भाशयाच्या वरील बाजूस असल्याने गर्भाशय पलटी झाले असावे, असा अंदाज बांधण्यात आला. दरम्यान महिलेचा आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट पॉजिटव्ह आल्यामुळे तिला कोव्हिड कक्षामध्ये पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. बाळाचा कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला आईपासून विलग ठेवण्यात आले. आई आणि बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गर्भाशय अंतर्बाह्य उलटे होणे ही एक दुर्मिळ आणि जीवघेणी गुंतागुंत आहे. यामध्ये 15% माता मृत्यू होतात. जागरूक देखरेख, सक्रिय व्यवस्थापन आणि गर्भाशयावर जास्त दाब न देता हळुवारपणे वार काढणे इत्यादी उपाय केल्यामुळे गर्भाशय उलटे होत नाही. महिलेवर ससून सर्वोपचार रुग्णालयांमध्ये पथक प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली जाधव, डॉ. स्नेहल तिनाईकर, डॉ. अनुष्का माने यांचा समूहाने यशस्वी उपचार करून बाळ आणि बाळंतिणीचे प्राण वाचवले. अशाप्रकारे ससून रुग्णालयात अतिशय जोखमीचे कोरोनाबाधित रुग्ण, तीव्र रक्तदाब, झटका येणे प्रसूतिपूर्व वाढ झाल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, रक्तक्षय, पूर्वी एक किंवा दोन सिझर झालेल्या गरोदर मातांची प्रसुती स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरीत्या झाल्या आहेत. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सर्व निवासी डॉक्टर व तज्ञांचे अभिनंदन केले.