नम्रता फडणीस- पुणे : महाविद्यालयात सिनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअरचे ‘रॅगिंग’ केले जाते, हे सर्वांना माहितीच आहे. शाळांमध्येसुद्धा एका मुलाने दुसऱ्याला चिडवणे, मारणे, खोडी काढणे किंवा एखाद्याची तक्रार शिक्षकांकडे करणे हे फारसे नवीन नाही. हे होतच असते. मात्र, ज्याने आपल्याला त्रास दिला, त्याचा बदला घेण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी आता सोशल मीडियाचा आधार घेऊ लागले आहेत. त्याचे किंवा तिचे फेक अकाऊंट तयार करणे, फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर टाकणे अशा प्रकारच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी सायबर सेलकडेदेखील आल्या आहेत. इंटरनेट आणि समाजमाध्यमाचा वापर करून मुलांमध्ये ‘बुलिंग’ ( रॅगिंग किंवा दादागिरी) करण्याचे वाढते प्रमाण ही समाजव्यवस्थेसाठी एक धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पालकांनो, वेळीच सावध व्हा! असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. आज शाळकरी मुलांच्या हातात ‘मोबाईल’चे खेळणे खुळखुळत आहे. मुलांशी संवाद राहण्यासाठी हे खेळणे पालकांनी जरी मुलांना दिले असले तरी ही मुले त्या खेळण्याचा कशा पद्धतीने वापर करत आहेत, याची पालकांना पुसटशी कल्पनादेखील नाही. शाळकरी मुलांचेही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फेसबुकवर अकाऊंट आहेत. पालकांना त्याचा पत्ता लागू नये म्हणून अनेक मुलांनी फेक अकाऊंट तयार केली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमध्ये ‘बुलिंग’ ( रॅगिंग/दादागिरी)चे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने सायबरतज्ज्ञ मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही शाळकरी मुलांमधील वाढत्या ‘सायबर बुलिंग’ला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सायबर बुलिंग’मध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाळांमध्ये एखाद्याला टार्गेट करून त्रास देणे, जोड्या लावणे, वेडेवाकडे बोलणे हे प्रकार पूर्वी होतच होते. मात्र, आता स्मार्ट फोनमुळे हे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपवर एखाद्याला बकरा बनवून त्रास देणे, असूयेमधून दुसऱ्या मुला-मुलीचे फेक अकाऊंट तयार करणे असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे, आपण मुलांना लवकर सगळे करण्याची मुभा देत आहोत. पालक लहान मुलांच्या जगाप्रति हलगर्जीपणा दाखवत आहेत. मुलांमध्ये लैंगिकतेबाबत संवेदनशीलता निर्माण करताना आपणच वेगळेच काहीतरी करीत आहोत का? याचाही विचार झाला पाहिजे.
पालकांच्या व्हॉट्सअॅपवर लैंगिकतेविषयी अनेक मेसेज असतात, त्यांच्याकडूनही ते फॉरवर्ड केले जातात, मुलांच्या हातात मोबाईल पडला, की ते मेसेज मुले वाचणारच ना? जितका दोष मुलांचा आहे, तितकाच पालकांचादेखील आहे. आपल्याकडे माध्यम शिक्षणाबाबतच मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. यापुढची जनरेशन ही मोबाईलबरोबरच वाढणार आहे; त्यामुळे आधी पालकांना माध्यम कशा पद्धतीने हाताळावे, याबाबत प्रशिक्षण देण्याची खरी गरज आहे. ..........
पालकांनो, वेळीच सावध व्हा!‘शाळांमधील मुला-मुलींसंदर्भातील काही तक्रारी सायबर सेलकडे आल्या होत्या. त्यात मैत्रिणीला अद्दल घडविण्यासाठी तिचे इन्स्ट्राग्रामवर फेक अकाऊंट उघडून तिचे फोटो मॉर्फ करून टाकण्यात आले होते. मुलांमध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे. हे खरे आहे. यासाठी पालकांनी मुलांचे मोबाईल तपासण्याची गरज आहे. मुले कोणत्या साईट पाहतात, कोणती मोबाईल अॅप्लिकेशन त्यांच्याकडे आहेत, हे पाहणे आवश्यक आहे- जयराम पायगुडे, प्रमुख, सायबर क्राईम सेल
......................
पालकांनी काय करावे?* सायबर जगतातील धोक्यांची मुलांना जाणीव करून द्या.* मुलगा-मुलगी मनमोकळेपणे बोलायला घाबरत असतील, तर त्यांच्याशी विश्वासाने बोला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. * मुले अशा त्रासाला सामोरी जात असतील, तर त्यांना गप्प बसायला न सांगता आवाज उठवायला सांगा.* मुलांच्या हातात मोबाईल देताना तो-ती कोणत्या गोष्टी पाहतात, काय मेसेज पाठवतात, कुणाशी बोलतात, याकडे दुर्लक्ष करू नका.