मढ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथे रविवारी रात्री बिबट्याने चार वर्षांच्या साई मंडलिक या मुलाला घरातून सर्वांसमोर उचलून नेऊन ठार मारले. या घटनेनंतर सोमवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी डिंगोरे गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ नगर- कल्याण जाम करून ठिय्या आंदोलन केले. या वेळी वनविभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच वनविभाग मुर्दाबाद, वनविभागाचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. साधारणत: काही वेळातच महामार्गावर दोन ते तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून महामार्ग जाम झाला.या वेळी ओतूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाल हे फौजफाट्यासह तेथे पोहोचले. संतप्त जमाव वनविभागाविरुद्ध संताप व्यक्त करत होता. तसेच बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी हमी मागत होता. परंतु या वेळी पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी जमावाची समजूत घालून आंदोलन स्थगित करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालय ओतूर येथे कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी रात्रपाळीस जास्त कर्मचाऱ्यांसह गस्त घालणे, बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी दोन टीम, परिसरात सात पिंजरे लावणे, वारसांना तातडीने मदत व पाळीव प्राण्यांची नुकसानभरपाई देणे, तसेच बिबट्या जेरबंद होईपर्यंत ही मोहीम सुरू ठेवणे आदी मागण्या लेखी स्वरूपात दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनाला शिवाजी शेरकर, संदीप शिंगोटे, विश्वास आमले यांनी मार्गदर्शन केले, तर या वेळी शेखर लोहोटे, विश्वास पाडेकर, विजय आमले, सुभाष लोहोटे, समीर लोहोटे, अहिलु लोहोटे, समीर लोहोटे, किरण हांडे, पप्पू लोहोटे, विश्वास आमले, राजेंद्र उकिर्डे, सुभाष लोहोटे, शंकर लोहोटे, कैलास डुंबरे, संदीप नेहरकर, गणेश आमले, मच्छिंद्र मंडलिक, संतोष मंडलिक, एकनाथ शिंगोटे, उल्हास शेरकर, सोमा मंडलिक, मकरंद लोहोटे व साई प्रतिष्ठानचे सर्व सभासद, आम्ही संभाजी प्रतिष्ठानचे सर्व सभासद, आमले शिवार मित्र मंडळ व डिंगोरे गावातील सर्व मंडळे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या वेळी विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, वाय. एल. केसकर, संजय कडू, सचिन रघतवान उपस्थित होते.
डिंगोरेत नरभक्षक बिबट्याची दहशत
By admin | Published: May 05, 2015 3:03 AM