पुणे : राजकीय पक्षाने एकदा प्रवक्ता केले की, त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यांनी फक्त बोलायचे, त्यांना कोणतेच पद मिळत नाही, त्यामुळे प्रवक्ता होणे सोपे नाही. पण मला नंतर उपसभापती होता आले, हा भाग वेगळा आहे,’’ अशा भावना विधानपरिषधेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ पत्रकार कै. वरूणराज भिडे मित्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कै. वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्यांनी या वेळी प्रवक्ता होण्यामागील दु:ख उलगडून सांगितले. कारण त्या गेल्या काही वर्षांपासून प्रवक्ता पदावर कार्यरत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा चार जणांना प्रवक्तापदी नियुक्त केले होते. त्यामध्ये गोऱ्हे यांचा समावेश होता. त्या शिवसेनेत पहिल्या महिला प्रवक्त्या बनल्या होत्या. त्या टीव्ही चॅनलवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जायच्या. त्याबाबतचे अनुभव त्यांनी या वेळी सांगितले. चॅनलवरील चर्चा कशी मॅनेज केलेली असते, चर्चेत सहभागी होण्यासाठी कोणा-कोणाला कसे मुद्दाम आणले जाते, याविषयी सविस्तर त्या बोलल्या. तेव्हा प्रवक्ता होणे चांगले असले तरी त्याचे काही धोके आहेत, त्यात एक हा की, प्रवक्ता केवळ बोलतच राहतो, पण त्याला काही पद मिळत नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली.
पण त्यानंतर मला उपसभापती होता आले, हा भाग वेगळा, असेही त्यांनी स्पष्टीकरणही दिले. प्रवक्ता होण्याचा चांगला फायदा हा असतो की, तुम्ही सतत चॅनलसमोर येता आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुम्ही पोचता, असेही त्या म्हणाल्या.