भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर रावणगावपासून पळसदेवपर्यंत दोन्ही लेनवर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. यात वाहनांच्या नुकसानाबरोबरच नागरिकांचे जीव जात असताना टोल प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतपासून इंदापूरपर्यंतच्या टप्प्याचे नूतनीकरणाच्या कामाला ५ वर्षे उलटून गेली आहेत. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे ५ वर्षांत रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. मात्र प्रत्येक वेळी टोल प्रशासन तसेच महामार्ग प्रशासन यांच्याकडून तात्पुरती ठिगळी लावून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रावणगाव ते डाळज पळसदेव टप्प्यात खड्ड्यांची मालिका तयार झाली असून, या खड्ड्यांमुळे दिवसात एक-दोन अपघात घडत आहेत. अचानक समोर आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या गाडीशी टक्कर होऊन अपघात होत आहेत. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर रोज एक ते दोन अपघात असल्याची माहिती मिळत आहे. याकडे टोल प्रशासन व महामार्ग प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहे. याबाबत टोल प्रशासनाकडे अनेक वाहनधारकांनी तक्रार केली तरी पहिल्या कंपनीचा करार संपला असल्यामुळे नवीन कंपनीच्या ताब्यात रोडची सूत्रे गेल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र ताबा कोणत्याही कंपनीकडे असला तरी टोल कलेक्शन थांबविण्यात येत नसेल तर दुरुस्तीचे काम का थांबविण्यात येते, असा सवाल उपस्थित होतो. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे मान्य करीत खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित कंपनीला दोषी धरून अगदी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान असल्याचे सांगितले. तसेच पोलीस ठाणे हद्दीत अपघात घडल्यास आपण संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.अनधिकृत पार्किंग, अवैध व्यावसायिकांचे महामार्गावरील अतिक्रमण तसेच महामार्गाच्या शेजारीच भरणारे आठवडे बाजार यामुळे सर्वात अपघाती रोड म्हणून पुणे-सोलापूर महामार्गाची ओळख बनत आहे. तर करोडो रुपये टोलच्या माध्यमातून कमविणारी टोल कंपनी आणि यावर नियंत्रण असणारे नॅशनल हायवे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडून अनेकांना जिवाला मुकावे लागत आहे. तर काहींना जन्माचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांना सुलतानी दंड आकारणाºया सरकारने सुविधांकडे ध्यान देणे गरजेचे आहे...........
वरवंड : वरवंड (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडलेले असून, या महामार्गाची दुरवस्था झाली आहे; मात्र याकडे टोल कंपनी दुर्लक्ष करीत आहे.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंडजवळ कौठीचा मळा परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या महामार्गावर पाटस येथे टोलवसुली जोरदार चालू आहे व या टोल कंपनीची एक गाडी देखरेख करण्यासाठी पाटस ते यवत असे सतत लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असते. त्यांना हे खड्डे दिसत नाही का, का जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. जर पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीने याबाबत टोल प्रशासनाला सांगितले असेल, तर याकडे टोल कंपनी सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे; तसेच वरवंड येथील वरवंड-चौफुला सर्व्हिस रस्ताही मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.पाटस येथे टोल कंपनी जोरदारपणे टोलवसुली करीत असून ते रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. जर टोल कंपनी टोल घेत आहे, मग रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्त करणार तरी कोण, असा प्रश्न प्रवासीवर्ग करत आहेत.