कळस : इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मंदिराकडे जाण्यासाठी असणारा खडकवासला कालव्यावरील एकमेव पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. दगडी पुलाला संरक्षक कठडे नाहीत. तसेच या ठिकाणी साध्या पुलावर कडेला धोक्याची सूचना देणारा फलकसुद्धा लावण्यात आलेला नाही.बुधवारी (७ नोव्हेंबर) बाबीर यात्रेला सुरुवात होत आहे. यात्रेसाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असल्यामुळे मोठी गर्दी होते येण्या-जाण्यासाठी हाच एकमेव पूल असल्याने गर्दी व चेंगराचेंगरी होऊन अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दगडी पुलाचे दगड काही ठिकाणी ढासळू लागले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तसेच अनेक वर्षांपासून बांधकाम झालेला हा पूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे अपघाताची भीती नागरिक व्यक्त करत आहे. पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.एल वळण असल्याने या ठिकाणी यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहेत. यात्रा कालावधीत अनेकदा पुलावरून भाविक खाली कोसळून अपघात झाले आहेत. मात्र खडकवासला कालव्यावरील पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी केला आहे.
खडकवासला कालव्यावरील पूल वाहतुकीस धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 2:42 AM