-----
कदमवाकवस्ती : कवडीपाट टोलनाक्यावर धोकादायक असलेले केबिनचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच त्याची गांभीर्याने दखल घेत ती केबिन प्रशासनाने काढून टाकली. मात्र असे असले तरी केवळ वृत्तामध्ये दिसत असलेली केबिन काढून टाकण्यापुरतेच काम प्रशासनाने केले असून, त्या जवळ असलेली दुसरी केबिन काढण्याचा ‘कॉमन सेन्स’ प्रशासनाने दाखविला नाही. त्यामुो केबिन काढली तरी अद्याप अपघाताचा धोका पूर्णपणे टळला नाही.
सोलापूर-पुणे महामाहार्गावर कवडीपाट येथे पूर्वी टोलनाका उभा करण्यात आला होता. टोलनाक्याची मुदत संपल्यावर तो बंद झाला. मात्र टोलवसुलीसाठी रसत्याच्या मधोमध उभी करण्यात आलेले केबिन मात्र जसेच्या तसे राहिले. वर्षानुवर्षे त्या केबिनची देखरेख नव्हती. त्यामुळे केबिनचा पत्रा गंजला व केबिन एका बाजूला कलली होती. त्यामुळे ती केबिन वाहन जवळून गेल्यानेही हादऱ्याने पडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. बंद टोलनाक्यावरील या धोकादायक केबिनबद्दल प्रशासन अनभिज्ञ नव्हतेच, अनेक अधिकारी या ठिकाणाहून प्रवास करताना त्यांच्या नजरेतही त्या धोकादायक केबिनचे वास्तव समोर आले होते आणि नागरिकांनीही केबिन काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.
एकदा रस्त्यावर याच टोलनाक्यावरील आणखी एक केबिन पडून किरकोळ अपघात झाला होता. त्यावरून भविष्यात मोठा अपघात घडण्याचे संकेत स्पष्ट होते तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही. अखेर पडलेली केबिन कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाजूला करण्यात आली. पुणे सोलापूर महामार्ग हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) विभागाकडे असून याची जबाबदारी संपूर्णतः त्यांची असून देखील त्यांचे या महामार्गावर दुर्लक्ष केले जात आहे.
--
बंद टोलनाक्याचा वापर जाहिरातीसाठी
टोलनाका बंद झाला तरी येथील बंद टोलनाक्याचा वापर फक्त वाढदिवसाच्या व प्लॉटिंगच्या जाहिराती पुरता होत असून या ठिकाणी या केबिनमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून, कदमवाकवस्ती गावाच्या सुरवातीला घाणीच्या ठिकाणावरून प्रवेश होत असल्याने स्थानिक नागरिक नाराज होत आहेत. लवकरात लवकर हा बंद टोलनाका हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--
फोटो क्रमांक : २२कदमवाकवस्ती टोलनाका फोटो
फोटो ओळ : पुणे सोलापूर महामार्गावर धोकादायकरीत्या पडलेली केबिन.