पुणे : लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी, लक्षणे नसतानाही कोरोनाची लागण झालेले रुग्ण, वाढते रुग्ण व मृत्यू, बंदिस्त ठिकाणे अशा कारणांमुळे लोकांमध्ये आता कोरोना फोबिया वाढत चालला आहे. शरीरामध्ये काहीही बदल जाणवला तरी आपल्याला कोरोना तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लगेच डॉक्टर किंवा समुपदेशांचा सल्ला घेतला जात आहे.देशातील लॉकडाऊनला एक महिना झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय, कंपन्या, सेवा बंद आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी रुग्ण आढळून येत असल्याने लोकांनाही भिती वाटू लागली आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. पण त्याचे रुपांतर आता फोबियामध्ये होऊ लागले आहे. सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे असल्यासारखा भास लोकांना होऊ लागला आहे. त्यामुळे झोप न लागणे, भीतीदायक स्वप्न पडणे, झोपेतून दचकून जागे होणे, असे प्रकार घडू लागले आहे.याषियी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, सध्या सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे असल्याने त्यातील काहीही झाले तरी लोकांना भीती वाटत आहे. लोक किरकोळ गोष्टींनाही घाबरू लागले आहेत. आपल्याला कोरोना तर नाही ना, याची भीती आहे. त्यामुळे घरात असूनही सतत हात धुवणे, अंघोळ करणे, कपडे धुवणे, घरात कोणालाही न घेणे या गोष्टी वाढल्या आहेत. दक्षता घेणे आवश्यक असले तरी त्यासोबत मानसिक ताणही वाढल्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे थोडे काही वाटले तरी लोक लगेच फोन करतात किंवा दवाखान्यात येत आहेत.---------------लोकांच्या मनातील भिती वाढत चालली आहे. अशिक्षित लोकांसह उच्च शिक्षितांकडून फोन येत असून कोरोनाविषयी माहिती विचारली जात आहे. त्याची लक्षणे, आपल्याला कोरोना नाही ना, जवळ रुग्ण आढळल्याने वाढलेली भिती, लॉकडाऊन आदी मुद्यांवर लोक बोलतात. रोजंदारीवरील मजुरांना खाण्याची भ्रांत असल्याने त्यांच्याकडूनही मदतीसाठी संपर्क साधला जात आहे. कोरोनाच्या भितीबरोबरच त्यांची जगण्यासाठीचीही धडपड सुरू आहे. ही भिती लॉकडाऊन असेपर्यंत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.- प्रा. चेतन दिवाण, समुपदेशक-----------
धोकादायक! वाढते रुग्ण व मृत्यू,बंदिस्त ठिकाणे यामुळे लोकांमध्ये वाढतोय 'कोरोना फोबिया'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 6:24 PM
शरीरामध्ये काहीही बदल जाणवला तरी आपल्याला कोरोना तर नाही ना, अशी भीती निर्माण..
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय, कंपन्या, सेवा बंद दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढदक्षता घेणे आवश्यक असले तरी त्यासोबत मानसिक ताणही वाढल्याची ही लक्षणे