निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासून हवामानामध्ये अचानक बदल झाला आहे. खराब हवामान व धुक्यामुळे येथील पिकांवर वेगवेगळे रोग येण्याची भीती शेतकऱ्यांंकडून व्यक्त करण्यात येत आहे. या हवामानाचा मोठा परिणाम पानमळ्यांवर होईल, असे शेतकऱ्यांडून सांगितले जात आहे. सद्य स्थितीमध्ये पानमळ्यामध्ये असलेल्या फाफडा जातीच्या पानांवरती धुक्यामुळे करपा रोग येण्याची भीतीही पानउत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. निमगाव केतकी परिसरासह पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये विविध प्रकारची पिके आहेत. यामध्ये डाळिंब, मका, ऊस, टोमॅटो तसेच वेगवेगळ्या पालेभाज्यावर्गीय पिकांचा समवेश आहे. याबरोबरच निमगाव परिसरामध्ये पानमळ्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्व पिकांवरती हवामानामध्ये झालेल्या अचानक बदलाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक रोग या पिकावर आल्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात निमगाव केतकी परिसरासह इंदापूर तालुक्यामध्ये अचानक गारपीट झाली होती. या गारपिटीमध्ये या भागातील डाळिंब पानमळे, टोमॅटो या पिकांसह सर्व प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पानउत्पादक शेतकरी प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी वर्षभर फाफडा जातीची पाने पानवेलीच्या अंगावर जोपासतात. या पानांची निगा राखण्यासाठी पानवेलींना वेळच्या वेळी पाणी देणे, खते टाकणे, औषध फवारणे, माती टाकणे पानवेलींच्या अंगावरील इतर जातीचे पाने वेळच्या वेळी खुडणे अशी काळजी घेत असतात. कारण वर्षभर संभाळलेली ही पाने पानउत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देतात . मागील वर्षीही पाने खुडण्याच्या कालावधी येण्यापूर्वीच अवकळी गारपीट झाली आणि फाफडा जातीची पाने गारांच्या फटक्याने फाटून गेली. त्यामुळे या वेलीची उत्पादन क्षमता मंदावली. याचा परिणाम चालू वर्षी पानउत्पादक शेतकऱ्यांना प्रकर्षाने जाणवत आहे.या वर्षामध्ये निमगाव केतकीला इंदापूर तालुक्यातील अनेक पानमळ्यांची अवस्था बिकट झाली आहे. (वार्ताहर)नवीन वर्षाची सुरुवात धुक्यात...नवीन वर्षाची सुरुवात होत असताना पहिल्याच दिवशी खराब हवामान पडल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसत आहे. कारण, गेल्या वर्षभर अनेक संकटे आल्याने शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. २०१५ची सुरुवात खराब वातावरणात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते.४काही पानवेली बसवल्यानंतर हव्या त्या प्रमाणामध्ये फुटल्या नाहीत त्यामुळे पानांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. पर्यायानेच याचा उत्पन्नावर परिणाम होताना दिसत आहे. सद्य स्थितीमध्ये खराब हवामानामुळे फाफडा पानांवरती जाळी तयार होणे, पाने लागट होणे, पानांच्या पाठीमागील बाजूस पांढरा मावा येणे, काळे डाग पडणे असे रोग पानवेलीवरती येणार असून, याचा उत्पन्नावर परिणाम होईल, असे सध्याचे चित्र आहे.