शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भाविकांना नदीपात्रातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, घनकचरा, दुर्गंधी, अतिक्रमण आदी विविध समस्यांमुळे ‘देवाच्या दारी समस्या भारी’ असाच प्रत्यय भाविकांना अनुभवयास मिळत आहे. सध्या पवित्र इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला असून पात्रात अल्प प्रमाणात पाणी शिल्लक आहे. अलंकापुरीत दाखल झाल्यानंतर पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून श्री माऊलींच्या समाधीचे दर्शन घ्यावे, अशी भाविकांची इच्छा असते. परंतु नदीपात्रात अपुऱ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने भाविकांची निराशा होत आहे. त्यातच शिल्लक पाण्यात अस्त्याव्यस्त पडलेला केरकचरा, काचा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खरकटे अन्न आदी गोष्टींमुळे दुर्गंधी येत आहे. परिणामी भाविकांना पवित्र इंद्रायणीला हात जोडून मार्गक्रमण करावे लागत आहे. सोमवारी (दि. २३) दुपारच्या दरम्यान नदीपात्राशेजारील पायऱ्यांवर दुर्गंधीयुक्त कचरा गोळा करून पेटवून दिला होता. तसेच नदीपात्रात काही ठिकाणी काचा पडल्याने नदीत पाय धुण्यासाठी उतरलेल्या भाविकांना लक्ष देऊन चालावे लागत आहे. मुख्याधिकारी संतोष टेंगले यांच्याशी संपर्क साधला असता, चार दिवसांपूर्वी नदीपात्रातून कचरा काढण्यात आला आहे. २६ जानेवारीला पात्र स्वच्छ केले जाणार आहे. तत्पूर्वी नदीतील दुर्गंधीचा सामना भाविकांना करावा लागू नये, म्हणून तत्काळ स्वच्छता केली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)
आळंदीत इंद्रायणी पात्रात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: January 24, 2017 1:37 AM