इंदापूर : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत जीर्ण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होताच, पंचायत समितीच्या प्रशासनात गतिमान हालचाली होऊन चार दिवसांतच जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार बामणे यांनी मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र हजारे यांना देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. शाळा क्रमांक २ च्या कामासाठी लागणारा निधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला असून, १५ दिवसांमध्ये मंजूर होऊन कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांनी दिले आहे.
शाळा क्रमांक १ च्या दुरुस्तीला तत्काळ सुरवात केली असून, त्यामध्ये फरशी बसविणे, संपूर्ण शाळेचे पत्रे बदलणे, व्हरांड्यातील लाकडी पोल बसविणे या दुरुस्तीकामाचा आरंभ मुख्याध्यापक प्रवीण धार्इंजे, राजेंद्र हजारे, ठेकेदार सौरभ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३0) करण्यात आला. जलद गतीने दुरुस्तीकामाला सुरुवात केली असून, शाळा क्रमांक २ ला अजून २0 लाख रुपये निधीची गरज आहे, असे शिक्षकांनी सांगितले. पूर्वी या कामासाठी प्रत्यक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वेळोवेळी पाहणी करून नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना आदेश दिले असताना कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नव्हती. श्री नारायणदास रामदास ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी वेळोवेळी शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाची डोळेउघडणी केली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे हजारे यांनी सांगितले.जिल्हा परिषद सरकारी शाळेची दुरुस्ती करण्यासाठी काही शिक्षणसम्राटांनी छुप्या पद्धतीने विरोध केला होता. कारण ही शाळा बंद करून यातील ४५0 विद्यार्थी आसपासच्या खाजगी शाळेत भरती करण्यासाठी दुरुस्तीला न दिसणारा विरोध करण्यात आला होता. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रेटा लावल्याने ना इलाजास्तव प्रशासनाला दुरुस्ती करणे मान्य करावे लागले. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने सामाजिक बांधिलकी जपत पुणे जिल्हा परिषद अंतर्गत शाळा क्रमांक १ व २ साठी ३0 लाख रुपये व तारेची शाळेसाठी ५ लाख असा एकूण ३५ लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शाळेची जागा नगरपालिकेची असल्यामुळे ती जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली नसल्यामुळे ते काम तेथेच रखडले. मात्र, शाळा क्रमांक २ साठी निधी अजून मंजूर झालेला नसून त्या शाळेची दारे व खिडक्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. ती लवकरात बसवून देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.४जिल्हा नियोजन बैठकीत इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ साठी १५ लाख व शाळा क्रमांक २ साठी १५ लाख अशी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र शाळेसाठी अजूनदेखील एक रुपया खर्च केलेला नसून तो ३0 लाख रुपयांचा निधी गेला कुठे? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.