दौंड : दौंडच्या भीमा नदीवरील दौंड-अहमदनगरकडे जाणारा पूल धोकादायक झाला असून या पुलाला केव्हा जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा शासनाने या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलावरील रस्ता अरूंद स्वरूपाचा आहे. साधे दुचाकी वाहन जरी गेले तरी पुलाला हादरे बसतात, तर जड वाहने आल्यानंतर पुलाचा रस्ता खाली वर होतो. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे या खड्ड्यात वाहने अडकून अपघात झाल्याचे प्रमाण यापूर्वी घडलेले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले संरक्षक कठडे कमकुवत स्वरूपाचे आहेत. दौंडवरून नगरकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. पुलाला वापरलेले निकृष्ट साहित्य आणि त्यातच पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर वाळूमाफियांनी वाळूउपसा केला असल्याने पुलाच्या प्रत्येक खांबाला तडे गेलेले आहेत.पथदिव्यांचा अभाव : जीव मुठीत धरून प्रवासपुलावर पथदिवे नसल्यामुळे या पुलावरून रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दौंडवरून नगरकडे जाताना आणि नगरहून दौंडकडे येताना अशा दोन वाहनांची या पुलावर क्रॉसिंग झाली तर वाहतुकीस अवघड होऊन बसते. कुठले वाहन केव्हा नदीत कोसळेल, याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे वाहनचालकदेखील जीव मुठीत धरून या पुलावरून वाहने चालवतात. पुलाच्या परिसरात नेहमीच नदीपात्रातील पाणी असल्याने यापूर्वी दुचाकीचालक पुलावरून कोसळून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत.पुलावरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे २६ आॅक्टोबर २०१६ रोजी वाळूचा ट्रक पुलाचा संरक्षक कठडा तोडून पुलावर अधांतरी अडकला होता. दरम्यान, या घटनेत पाण्यात पडून दोघा युवकांचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. एकंदरीतच हा पूल मृत्यूचा सापळा झाला आहे. तेव्हा शासनाने या पुलाची वेळीच डागडुजी करावी; अन्यथा मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
भीमानदी पुलावरून धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:20 AM