पुणे : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक गावांची विकास कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे दिले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रलंबित कामे पूर्ण करावी लागणार आहेत. पाऊस थांबल्याने रखडलेली कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.माळीण गावातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील दरड प्रवण भागातील गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याची माहिती समोर आली. त्यावर संबंधित गावांच्या भोवती सुरक्षा भिंत बांधणे, पावसाच्या पाण्याला योग्य दिशा देणे, झाडे लावणे आदी कामे करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. मात्र, सुमारे एक ते दीड वर्ष निधीअभावी ही कामे रखडली होती. तसेच, पाऊस सुरू झाल्याने काम करण्यास अडथळे येत होते. त्यामुळे काम करणे शक्य नव्हते. परिणामी, पावसाळ्यात ही कामे बंद ठेवली होती. त्यातच वनविभागाने या विकासकामांना हरकत घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास चालढकल केली जात होती. परंतु, कोणत्याही परिस्थितीत रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात धोकादायक गावांच्या विकास कामांबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात वनविभागाकडून विकास कामांना हरकत घेतली जात असल्याचे समोर आले. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता संबंधित धोकादायक गावांची विकासकामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ ही कामे सुरू करावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनतर्फे दिले आले.जिल्हा प्रशासनाने २३ धोकादायक गावांमध्ये विकासकामे करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने भुशी व घोल या ठिकाणी विकासकाम करण्याची आवश्यकता नाही, असा अहवाल दिला. त्यामुळे आता केवळ २१ गावांमध्येच विकासकामे केली जाणार आहेत.जिल्ह्यातील दरड प्रवण गावेफुलवडेजवळील भगतवाडी, माळीण परिसरातील परसवाडी, आसाणे, जांभोरीजवळील काळेवाडी आणि बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळेवस्ती, माऊ मोरमाची वाडी, (सर्व मावळ), मोरगिरी पदरवस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर).
धोकादायक गावात दुरुस्तीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:36 AM