लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी तसेच काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून घोषित झाली आहेत. पावसाळा सुरू झाला की येथील गावकऱ्यांच्या काळजाचा ठाव सुटतो. छातीवर डोंगराचा भार घेऊन दररोज ही गावे उद्याचा दिवस सुखरूप उजाडावा, अशी प्रार्थना करून झोपी जात आहेत. या पाचही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे ही येथील गावकऱ्यांची गेल्या पाच वर्षांपासूनची मागणी आहे. सरकारी दरबारी अनेकदा या गावांच्या पुनर्वसनासाठी बैठका पार पडल्या. जागांचे सर्वेक्षण झाले. मात्र, अद्याप तरी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कशाची वाट पाहात आहे, असा प्रश्न ग्रामस्थांडून व्यक्त होत आहे. आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी या गावांना नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाली आहे. माळीणची घटना घडल्यानंतर संभाव्य धोकादायक गावांचा सर्वेक्षण करण्यात आले. यात तालुक्यातील ही गावे अतिसंवेदनशील असल्याचे समोर आले. पाच वर्षांपासून या गावांमध्ये दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे यांसारख्या घटना घडत आहेत. बेंढारवाडी येथे जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. काळवाडी येथे घरांना तडे गेले. या गावच्या वरील बाजूस आसणारा उंच डोंगर व त्यावरील अजस्त्र दगड कोणत्याही क्षणी सुटून गावावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळल्या आहेत. दवर्षी पावसाळा सुरू होताच या धोकादायक गावांमध्ये हमखास कोणत्या ना कोणत्या घटना घडत असतात. दोन वर्षांपूर्वी बेंढारवाडी येथे दरड कोसळली. जमिनीला पडलेली भेग मोठी व रूंद झाली. या घटनेमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आंबेगावचे तत्कालीन तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी तातडीने या भागाची पाहणी करून बेंढारवाडीच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर हालचाली करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला.
आपत्ती निवारण कायदा २००५ अंतर्गत तहसील कार्यालय आंबेगाव येथे उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट २०१६ रोजी आढावा बैठक झाली. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक गावांची सद्यस्थिती व पुनर्वसनासाठी येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. बेंढारवाडीच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी उपलब्ध केलेल्या जागेची प्राथमिक मोजणी करून जागेचा जीएसआयचा रिपोर्ट अहवाल घेण्याविषयी ठरविण्यात आले. येथील डिंभे धरणामुळे बाधित झालेली ३९ घरे व धोकादायक १६ घरांचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले. भगतवाडी येथील १३ कुटुंबे, पसारवाडी येथील २७ घरे, असाणे गावात १०० ते १२५ घरे आहेत. ग्रामपंचायतीला नोंदी आसणाऱ्या प्रत्यक्षात किती मिळकती आहेत. याचा आढावा घेऊन वस्तुनिष्ठ माहितीसह पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले होते. जांभोरीची काळवाडी येथील नं.१ मधील ३४ घरे व नं. २ मधील १७ अशा एकूण ५१ घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले. या सर्व धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी आदिवासी शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी त्या त्या गावातील ग्रामसेवकांना सूचित करण्यात आले होते.
चौकट
धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी पूर्वीच्या गावापासून जवळच नवीन योग्य जागा शोधणे, उपलब्ध जागेची मोजणी करून जीएसआय रिपोर्टनुसार योग्य असल्याची खात्री करणे, मूळ मालकाला त्या जागेचा योग्य मोबदला देणे, यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करत धोकादायक गावांच्या पुनर्वसित गावठाणांसाठी जागेचे संपादन करणे, हे एक प्रशासनापुढे मोठे आवाहन असल्याचे मुद्दे समोर आले होते. या नंतर जवळपास पाच ते सहा वर्षे उलटूनही अद्याप आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले आहे. लवकरात लवकर या गावांचे पुवर्नसन न झाल्यास भविष्यात पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याला माळीणसारख्या अप्रिय घटनेचा साक्षीदार होण्याची वेळ येणार आहे.
फोटो :
सोबत- फोटो,24 jully 2021 डिंभे पी१
(छायाचित्र- कांताराम भवारी)