इंदापूर : उजनी जलाशयाची पाणीपातळी घटल्याने उघडे पडलेले ऐतिहासिक पळसनाथ मंदिर इतिहासप्रेमींसाठी पर्वणी ठरले आहे. या मंदिराची प्राचीन शिल्पकला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होण्याची भीती आहे. पळसनाथ मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. यंद्याच्या दुष्काळात मंदिर पूर्णपणे उघडे पडल्यानंतर मंदिर पाहण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची पळसदेवला रीघ लागली आहे. राज्यभरातून दररोज हजारो पर्यटक पळसनाथ मंदिराला भेट देत आहेत. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे मंदिराच्या वास्तूला उपद्रव पोहोचत आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे मंदिराच्या वास्तूलाच धोका निर्माण झाला आहे. एकेठिकाणी मंदिराच्या सभामंडपाच्या छताचे दगड तुटले आहेत. येथून हुल्लडबाज पर्यटक मंदिराच्या वर चढतात, तर काही बेशिस्त तरुण थेट शिखरावर चढून सेल्फी काढतात. यामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने येथे येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवावे, तसेच हुल्लडबाजांवर योग्य कारवाई करण्याची मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे. (वार्ताहर)
अतिउत्साही पर्यटकांमुळे धोका
By admin | Published: May 31, 2016 2:08 AM