पुणे : धायरीत मद्यधुंद डंपरचालकाने पुढे असणाऱ्या 4 दुचाकीसह 6 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही अपघात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी डंपरचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, धायरी गावातून येताना डंपर वेगाने होता. रस्त्यावर गर्दी असल्याने पुढे जायला जागा नव्हती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपरचालकाना गाडीचा वेग आवरता आला नाही. उब-या गणपतीजवळ त्याने पुढे जाणा-या दुचाकींना धडक देण्यास सुरुवात केली. त्याने एकापाठोपाठ ८ दुचाकी गाड्यांना धडक दिल्यानंतर धायरेश्वर मेडिकलजवळ एक दुचाकी चाकाखाली अडकल्याने डंपर थांबला. डंपरची धडक इतकी जोरात होती की, अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाला. त्यांना काही कळायच्या आत ते रस्त्यावर कोसळले. जखमींना जवळच्या रुग्णालयात तर काहींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगला चोप दिला. या अपघाताने तेथे एकच गोंधळ उडाला होता. याची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात चार दुचाकी, एक सहा आसनी रिक्षा, छोटा हत्ती यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत करून काही वेळात वाहतूक सुरळीत केली.
धायरीत भरधाव डंपरने 6 वाहनांना उडवले, 8 जखमी तर 2 गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 10:57 PM