बारामती : डेंगीमुळे बारामती शहरातील आणखी एका महिलेचा पुण्यात उपचार सुरू असताना काल रात्री मृत्यू झाला. डेंगीमुळे मृत्यू झालेला बारामतीतील तिसरा बळी आहे. या महिलेवर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुण्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संगीता शिवाजी निगडे (वय ५०, रा. चिमणशहा मळा) असे या महिलेचे नाव आहे. यापूर्वी मोहन विठ्ठल पवार, सुवर्णा भिसे या दोन रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाला. तर संगीता निगडे यांचाही डेंगीने मृत्यू झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अजुनही डेंगीचे रुग्ण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या महिलेला सिल्व्हर ज्युबिली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांचा दावा आहे. तेथूनच पुण्याला नेण्याचा सल्ला देण्यात आला, असे सांगण्यात आले. मात्र, या संदर्भात माहिती देताना सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी सांगितले की, या महिलेवर सुरुवातीला शहरातील बुरूडगल्ली भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दगावलेली महिला दाखलच करण्यात आली नव्हती. आज संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांकडे चौकशी केली, तेव्हा खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित महिलेच्या मुलाने पुण्याला उपचारासाठी नेले, अशी माहिती मिळाली, असे भोई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बारामतीत डेंगीचा तिसरा बळी
By admin | Published: December 01, 2014 11:32 PM