पुणे : एनसीसीच्या पुणे मुख्यालयात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या इंटर शूटिंग स्पर्धेत पुण्याच्या एनसीसी छात्रांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. जवळपास १२ विद्यार्थ्यांनी राज्याच्या संघात स्थान मिळवले असून इंदोर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय इंटर डायरेक्टट्रेट शूटिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. राज्याच्या संघात एकूण २० छात्रांचा समावेश आहे.
पुण्यातील एनसीसी मुख्यालयाच्या आवारात गेल्या चार दिवसांपासून राज्यस्तरीय इंटर शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १ ते ४ सप्टेंबरदरम्यान या स्पर्धा पार पडल्या. यात राज्यभरातून एनसीसीच्या छात्रांनी सहभाग घेतला होता. यात पुण्याच्या छात्रांनी नेत्रदीपक कामगिरी केली. रविवारी सकाळी या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. यात पुण्याच्या १२ विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत राज्याच्या संघात त्यांचे स्थान निश्चित केले. तर ८ छात्र हे मुंबई, नाशिक येथील आहेत. डीडी पाटील विद्यालयाचा सुनील कांबळे यांनी उत्कृष्ट नेमबाजी करत मुलांमधून पहिला येत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तर मुलींमधून सपा महाविद्यालयाची छात्र समिधा चव्हाण हिने मुलींमधून सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
इंदाेर येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा
इंदोर येथे पुढील महिन्यात राष्ट्रीय स्तरावरच्या इंटर डायरेक्टट्रेक्ट शूटिंग स्पर्धा होणार आहेत. २३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात या स्पर्धा होण्याची शक्यता आहे. कर्नल सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा संघ या स्पर्धांसाठी जाणार आहे.
''इंटर ग्रुप शूटिंग स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो. सुरुवातीला रायफल कशी धरायची याची माहिती नव्हती. मात्र, माझ्या वरिष्ठांनी मला याचे प्रशिक्षण दिले. तीन वर्षांपासून मी सराव करत आहेत. माझ्या वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी पहिला येऊ शकलो. राष्टीय स्पर्धेत चांगली कामगीरी करून येत्या काळात मला ऑलम्पिक स्पर्धांची तयारी करणार असल्याचे सुवर्णपदक विजेता सुनील कांबळेने सांगितलंय.''
''मी १० मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत ७ वेस्ट झोन चॅम्पियनशिपमध्ये वरळी येथे चांगली कामगिरी करत नॅशनल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. सुरुवातीला मला याबद्दल काही माहिती नव्हते. मात्र, एनसीसीमुळे या स्पर्धेत मी चांगली कामगिरी करू शकले. असं सुवर्णपदक विजेती समिधा चव्हाण यावेळी म्हणाली.''