धनकवडी : कात्रज घाटाजवळ जुन्या बोगद्याच्या अलीकडे शंभर मीटर अंतरावर रस्त्यावर दगड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तर आठवड्यापूर्वी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडीच्या हद्दीत दरडीचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणालाही दुखापत अथवा नुकसान झाले नाही. मात्र यानिमित्ताने कात्रज जुन्या बोगद्यावरील धोकादायक दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भविष्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने आवश्यक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
बुधवारी रात्री कात्रज कडून कोंढणपूर कडे जाणाऱ्या पीएमपीच्या समोर हे दगड आले होते. चालक अमर चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून घटनेची माहिती अग्निशामक दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. रात्री सव्वादहाच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या धनकवडी सहकारन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आरोग्य निरीक्षक धनराज नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अग्निशामक दल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आले दगड व राडा रोडा बाजूला करण्यात आला.
दरम्यान मागच्या गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कात्रज जुन्या बोगद्या च्या शिंदेवाडी गावच्या बाजू कडील प्रवेशद्वाराच्या तोंडाशी ही दरड कोसळली होती. यावेळी पुण्याच्या दिशेने निघालेला टेम्पो आणि एक दुचाकी या दोन वाह नांच्या मध्यभागी या दरडीचा काही भाग कोसळला होता. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, शहरासह दक्षिण उपनगरात ही पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतील घाट रस्त्यांवर पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
पुणे-सातारा रोडवर कात्रज घाट व नवीन बोगदा परिसरात धोका दायक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कामे करण्यात आली असल्याचा दावा प्रशासना कडून केला असला तरी दरडींपासून पूर्णपणे सुटका मिळण्याची खात्री नाही. हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी घाट परिसरात सावधानतेने व काळजीपूर्वक गाडी चालवणे आवश्यक आहे.