अंध व्यक्तीला बरेचदा दुसऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो. मात्र कोरोनामुळे विशिष्ट अंतर राखून राहावे लागते. यामुळे अंध व्यक्तींचा आधार त्यांच्यापासून दूर गेला आहे. कष्टाच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत असताना कोरोनामुळे काम बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.
कोविड सेंटर तसेच रुग्णालयात अंध व्यक्तींना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे काही वेळा अंध रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच अद्यापपर्यंत किती अंध व्यक्तींना कोरोना झाला याची विशिष्ट आकडेवारी उपलब्ध नसल्याचे नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर फिजिकली चॅलेंजचे प्रमुख राहुल देशमुख यांनी सांगितले.
------------
आधार ही एकमेकांचाच!
ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले जाते. मात्र कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर बंदी आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. अन्नधान्याची मदत मिळते. मात्र दैनंदिन खर्चासाठी रोख हातात नाही.
- कविता व्यवहारे, अंध तरुणी
मुलाच्या मदतीने खाद्यपदार्थांचा ठेला चालवत होतो. मात्र कडक निर्बंधांमुळे सर्वच बंद आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलाला रिक्षा घेऊन दिली, मात्र धंदाच होत नाही.
- रफिक शेख, अंध व्यक्ती
दृष्टी नसली तरी हातावर हात ठेवून फक्त बसून राहणे कधी जमले नाही. खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करून सन्माने जगतो. मात्र कोरोनाने कंबरडे मोडले आहे. घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे.
कृष्णा ढेकळे, अंध व्यक्ती.
सरकारने अंध व्यक्तींबाबत नेमके काय धोरण ठरविले आहे? किमान ज्या योजना सुरू आहेत त्यांची अंमलबजावणी जरी प्रभावीपणे केली तरी अनेक प्रश्न सुटतील. समजातील अंधारात आयुष्य काढणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज आहे?
- दादा ऊर्फ नामदेव आल्हाट, अध्यक्ष, दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य