२०१७ साली ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. या दोन्ही गावांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे थकीत असणारे वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने या गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला असून रात्री-अपरात्री कामावरून घरी येणाऱ्या महिला भगिनींच्या , मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच रस्त्यांवर अंधारात चोरी व छेडछाडीचे प्रकार घडले आहेत.
यासंदर्भात या भागाचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी विद्युत विभाग पुणे मनपाचे मुख्य अभियंता कंदुल यांना प्रत्यक्ष भेटून विषयाचे निवेदन दिले. या गावांचा वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत करावा, अन्यथा मनपाच्या कार्यालयाचे वीजतोड आंदोलन या भागाच्या नागरिकांसमवेत केले जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. नागरिकांच्या गैरसोयीस कारणीभूत असणारे बेजबाबदार मनपाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये एसीमध्ये डामडौलात बसण्याचा अधिकार नाही, असेही गणेश ढोरे यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले.