लोकमत न्यूज नेटवर्क
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) चे सुपुत्र उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६४ व्या जर्मनी येथील अत्यंत अवघड असणारी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. सलग चार वर्षे आयर्नमॅन पुरस्कार मिळवून सर्वांत ज्येष्ठ भारतीय आयर्नमॅन बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
मूळचे डोर्लेवाडी येथील असणारे जाधव पुण्याचे उद्योजक आहेत. वयाच्या ६४ व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धेत किताब पटकावून महराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान त्यांनी उंचावली आहे. मनात तीव्र इच्छाशक्ती व कष्ट करण्याची तयारी असल्यास कुठलेही ध्येय साध्य करण्यास वयाची मर्यादा येत नाही, हे जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपला व्यवसाय सांभाळून सलग चारवेळा खडतर असा आयर्नमॅन किताब त्यांनी मिळवून दाखवला आहे. हा किताब मिळवणारे सर्वांत ज्येष्ठ नागरिक भारतीय हा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे.
सन २०१७ रोजी मलेशिया, २०१८ रोजी जर्मनीतील हॅम्बुर्ग व २०१९ रोजी क्लेजेनफर्ट ऑस्ट्रिया, तर २०२१ रोजी देखील जर्मनी हॅम्बुर्ग येथील आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅन किताब मिळवला. फूल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२ किमी धावणे समाविष्ट आहे. त्या क्रमाने आणि ब्रेकशिवाय स्पर्धा पूर्ण करायची असते. आयर्नमॅन स्पर्धा म्हणजे संपूर्ण जगात सर्वात कठीण एक दिवसीय सहनशीलता कार्यक्रम आणि स्पर्धकांचा कस पाहणारी स्पर्धा असते.
चौकट
पुढील आयर्नमॅन स्पर्धेसाठी दशरथ जाधव यांची अमेरिकेमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा अडीच पट भारी असणार आहे. १० किलोमीटर पोहणे,४२५ किलोमीटर सायकलिंगसह ८४ किलोमीटर पळणे असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.
कोट
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पोहणे, धावणे आणि सायकलिंगचा नियमित सराव केल्यामुळे ही स्पर्धा सलग चार वर्षे पूर्ण करू शकलो आहे. मनाची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांनी या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. पुणे शहर व ग्रामीण भागातील तरुणांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणार आहे.
-दशरथ जाधव.
०९०९२०२१ बारामती—०८
०९०९२०२१ बारामती—०९