देवस्थानांची लगबग : धर्मस्थळे उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मनुष्याला संकट काळात सर्वाधिक गरज असते ती मानसिक आधाराची. त्यामुळे संकटातून मार्ग गवसण्यासाठी आणि मन:शांती मिळविण्यासाठी आपोआपच भाविकांची पावले प्रार्थनास्थळांकडे वळतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती. ती खुली करण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर येत्या ७ ऑक्टोबरपासून प्रार्थनास्थळे उघडण्याचे जाहीर झाल्याने भक्तभाविकांच्यात आनंदाचे वातावरण आहे. व्यवस्थापक, विश्वस्त मंडळींचीही लगबग चालू झाली असून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर धर्मस्थळातील सोयी लावण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
प्रार्थनास्थळांची साफसफाई, डागडुजी, निर्जंतुकीकरण असे ‘विधी’ सुरू झाले आहेत. नवरात्राच्या घटस्थापनेपासून मंदिरे खुली होणार असल्याने यंदाचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
चौकट
वैद्यकीय मार्गदर्शन करणार
‘गुरूद्वारा’ म्हणजे गुरू रूप साथसंगत. रविवारी गुरूद्वारात आल्यानंतर शीख बांधव एकमेकांशी सुखदु:ख वाटायचे. कोरोनामुळे हे सगळे थांबल्याने संवादाची उणीव भासली. अध्यात्मिक आधार गेल्याने त्यांना अपूर्ण असल्यासारखे वाटायचे. आता गुरूद्वारा सुरू होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. गुरूद्वाराच्या शेजारच्या इमारतीत एक रुग्णालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. डॉक्टरांना विनंती करून दर रविवारी लोकांना मार्गदर्शन, उपचार सांगितले जाणार आहे.
-भोला सिंग, अध्यक्ष, गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा गणेश पेठ
चौकट
मुले-ज्येष्ठांना प्रवेश नाही
“गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही चर्च सुरू केले त्यावेळीदेखील सोशल डिस्टंन्सिंग, मास्क अनिवार्य, तापमान पाहणे यावर भर दिला होता. त्याच नियमांचे पालन आताही केले जाईल. चर्चमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करण्यास महत्त्व असते. मात्र, चर्च सुरू केल्यानंतर दहा वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना शक्यतो प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे एकीकडे आनंदाचे वातावरण असले तरी सावधगिरी देखील बाळगावी लागणार आहे.”
-प्रशांत गोरडे, ख्रिश्चन फेलोशीप सेंटर, वडगाव शेरी
चौकट
मशिदी सजवणार
“शासनाने प्रार्थनास्थळ सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. आजमितीला शहरात जवळपास १६० पेक्षा जास्त मशिदी आहेत. मशिदी खुल्या होणार असल्याने मुस्लीमांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्व मशिदी धुण्याचे काम सुरू झाले आहे. उत्सवात स्वागत केले जाते तशा मशिदी सजविल्या जाणार आहेत. ज्या सतरंजीवर नमाज पढला जातो त्या धुतल्या जात आहेत.”
-अहम्मद सय्यद, सचिव, सिरत कमिटी
चौकट
नवरात्रोत्सव उत्साहात
“नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासूनच मंदिरे खुली होत आहेत याचा आनंद आहे. उत्सव काळात चतु:श्रृंगी मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. त्या पार्श्वभूमीवर शासन जी नियमावली जाहीर करेल त्याचे पालन केले जाईल. पोलिसांबरोबर बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल.
-दिलीप अनगळ, चतु:श्रृंगी मंदिर देवस्थान
चौकट
ना प्रसाद, ना सांस्कृतिक कार्यकम
“सारसबागचा गणपती हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर खुले केले तरी दर्शनासाठी विशिष्ट वेळ राखीव ठेवली जाईल. सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टी आम्ही करणार आहोतच. मात्र, सुरुवातीच्या काळात प्रसादाची सोय उपलब्ध करून देणार नाही. भाविक फार वेळ मंदिरात राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. कोणतेही मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. देवस्थान विश्वस्तांची बैठक घेऊन संभाव्य अडचणींवर विचार केला जाईल.”
-सुधीर पंडित, प्रमुख विश्वस्त, देवदेवेश्वर संस्थान