पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या दर्शना पवारची हत्या करून फरार झालेला आरोपी राहुल हंडोरे याला निरनिराळ्या क्लृप्त्यांचा वापर करून पोलिसांनी पकडले. अटकेची कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. परराज्यांत पळून गेलेल्या राहुलचे लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना त्याला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले होते. त्यावरून त्याचा माग काढण्यात आला. मित्रांशी भांडण झाल्यामुळे पुणे सोडल्याचे खोटे कारण तो नातेवाईकांना देत होता.
राहुलला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी राहुलने बंगळुरू, बंगाल, चंडीगड, दिल्ली असा प्रवास केला. त्याचे लोकेशन पोलिस ट्रेस करत होते. मात्र, तो हाती लागत नव्हता. सुरुवातीला राहुलचे लोकेशन पुण्यातील कात्रज येथे दिसून येते होते. त्यानंतर तो राज्याच्या बाहेर गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. बंगळुरू येथून त्याने एटीएममधून पैसे काढले आणि तो प. बंगालमधील कोलकाता येथे गेला. तेथून त्याने नातेवाइकांशी संपर्क साधला. मित्रासोबत भांडण झाल्याचे सांगत आपण पुणे सोडल्याची माहिती देऊन त्याने फोन बंद केला. त्यानंतर त्याने चंडीगड, दिल्ली असा प्रवास केला. पुढे तो मुंबईत परत येत असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अंधेरी येथून अटक केली.
नातेवाइकांना सांगितले खोटे कारण
अचानक पुणे सोडून राहुल परराज्यात गेल्याचे कारण त्याला त्याच्या नातेवाइकांनी विचारले तेव्हा मित्रासोबत भांडण झाल्याने आपण पुणे सोडल्याचे खोटे कारण सांगितले तसेच पुढे काही न बोलता सरळ फोन बंद करून ठेवला. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते कोलकाता येथील दिसून आले.