पुणे : जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विननेजीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांना टोला लगावत एका शास्त्रज्ञाची पाठराखण केली.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, संशोधन आणि आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुस-या पुणे साय फाय महोत्सवात विज्ञान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, माजी खासदार प्रदिप रावत यावेळी उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी डार्विनचा सिध्दांत चुकीचा असल्याचे म्हटले होते यासंदर्भात डॉ. नारळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसंदर्भात मांडलेले तर्क बरोबर वाटतात. कारण ते अनेक निरिक्षणातून सिध्द झाले आहेत. परंतु त्यात जाणून घ्यायच्या पुष्कळ गोष्टी आहेत. ज्या आपल्याला माहिती नाहीत. डार्विनचा सिध्दांत अपूर्ण म्हणू शकतो, परंतु तो चुकीचा नक्कीच नाही.नारळीकर म्हणाले, केंब्रिज विद्यापीठात असताना मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्याकडून प्रेरणा घेऊन मराठी भाषेत विज्ञानलेखन करायला मी सुरुवात केली. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा परंतु मराठीमध्ये लिहिण्यात येणा-या विज्ञान कथा भयकथा वाटतात, त्यासाठी लेखन आणि विज्ञानाचा समतोल राखणे गरजेचे आहे.सामान्य माणसाला विज्ञान किती आणि कसे समजते हे शास्त्र आणि अभ्यासक लक्षात घेत नाहीत. मी स्वत:ला चांगला साहित्यिक मानत नाही. त्यामुळे मी लिहिलेल्या लेखातून विज्ञान किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यत पोहोचते मला माहिती नाही, त्यासाठी चांगल्या मराठी साहित्यिकांनी अधिकाधिक विज्ञानासंदर्भात लेखन केले पाहिजे याकडे नारळीकर यांनी लक्ष वेधले.
डार्विनचा सिद्धांत अपूर्ण म्हणू शकतो, पण चुकीचा मानता येणार नाही - जयंत नारळीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 8:37 PM