पिंपळे गुरव : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता करताना दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे विसर्जन घाटावर निर्माल्य कलशच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी पूजेचे साहित्य थेट मुळा व पवना नदीमध्ये टाकले आले. या नद्यांमध्ये सध्या कचऱ्याचेच साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदीप्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून शहर परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्यांमधील वाढलेली दुर्गंधी पूर्ण वाहून गेली. मात्र, दसऱ्याच्या सणामुळे पुन्हा नदीप्रदूषण वाढले आहे. शासकीय पातळीवर स्वच्छ नदी या उपक्रमासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. महापालिकेच्या वतीने मागील दोन वर्षांपूर्वी नदीजवळील पुलावर व विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश बसविण्यात आले. आज मात्र सद्य:स्थितीत निर्माल्य कलश गायब झाल्यामुळे नागरिकांनी निर्माल्य टाकायचे कुठे, हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना आरोग्य विभागाकडून या गोष्टीकडे डोळेझाक केली जात आहे. नवी सांगवीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी विसर्जन घाट आहे. त्या घाटावर दसऱ्यानिमित्त निर्माल्य कुंडाची सोय केली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी थेट पूजेचे साहित्य, घट, फुलांच्या माळा प्लॅस्टिक पिशव्यासह थेट नदीत टाकले. या वेळी महापालिका व आरोग्य विभाग यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा अटकाव केला नाही. त्यामुळे तेरी भी चुप, मेरी भी चुप अशी परिस्थिती नागरिकांची व प्रशासनाची झाली आहे. पिंपळे गुरव येथील पुलावरील निर्माल्य कलश गायब झाला आहे. त्या ठिकाणी फक्त महापालिकेचा फलक आहे. त्या फलकावर लिहिले आहे की, नागरिकांनी निर्माल्य कुंडातच निर्माल्य टाकावे. मात्र, या ठिकाणचेही निर्माल्यकुंड गायब आहे. त्या कलशाच्या जागेवर नागरिकांनी निर्माल्य टाकले आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यासह कचरा रस्त्यावर आला आहे. दिवसभर ऊन असल्यामुळे पूजेचे साहित्य सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संपूर्ण मुळा व पवना नदीच्या पात्रामध्ये झेंडूची फुले व प्लॅस्टिक पिशव्या दिसून येत होत्या. (वार्ताहर)
दसरा मुळा-पवनेच्या मुळावर
By admin | Published: October 13, 2016 1:53 AM