--
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटवडे : घोटवडे (ता. मुळशी) येथील गोडाबे परिवारातील लक्की हा साऱ्यांचा लाडका बैल. बैलगाडा शर्यतीत नाव कमावलेला लक्कीचे नुकतेच देहावसान झाले. त्यामुळे गोडाबे परिवाराला जणू घरातील सदस्याचे निधन झाल्याचे दु:ख झाले. त्यामुळे गोडाबे परिवाराने बैलाचे अंत्यसंस्कार करताना त्याचा दशक्रिया विधीही केला आणि जनवारांप्रति शेतकऱ्यांचे असलेले प्रेम साऱ्या गावासाठी जणू आदर्श ठरले.
गोडाबे परिवार परिसरात राजकीय, सामाजिक, शेतकरी परिवार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये माजी उपसरपंच बाळासाहेब, मुरलीधर, रामदास, विठ्ठल असे चौघे भाऊ. त्यांच्या मुलांमध्ये नीलेश हा गावचा सरपंच म्हणून काम केलेला तरुण तर शरद, भरत, सचिन, ऋषिकेश, आर्यन, प्रथमेश हे युवक असोत, या परिवाराने शेतीबरोबर व्यवसाय करून नाव कमावले व शेतीला उपयोगी म्हणून बैल पाळले. शेतात राबणारा बैल हा केवळ प्राणी न राहता तो शेतकऱ्याचा सखा होतो, घरातील सदस्य होतो. त्या सदस्याचे जाणे हे शेतकऱ्यासाठी अतिशय क्लेशदायक ठरते. त्यामुळे जणू घरातील सदस्य गेल्याप्रमाणे या लक्कीचे अंत्यसंस्कार व त्यानंतरचे विधी पूर्ण केले.
यावेळी ह. भ. प. चैतन्य म. वाडेकर यांचे प्रवचन झाले. त्यावेळी स्वप्नील तापकीर, वाजे विशाल तापकीर, संजय गोडाबे, गोरख सुतार, अजित भेगडे, धनंजय बोडके, सुमित पवळे, रोहित पवळे, महेश काळभोर, संदेश तांगडे, संतोष गोडाबे, सोमनाथ गोडाबे, जयराम खाणेकर, प्रशांत शेळके, समीर शेलार, सचिन मारणे, बंडू मोरे, समीर मारणे, मयूर गोडाबे, सतीश खाणेकर उपस्थित होते.