पुणे : दशक्रिया या चित्रपटासमोरिल विघ्ने दूर होत असल्याचे दिसत आहे. थिएटर असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिटीप्राइडमध्ये दशक्रियाचा एक शो लावला आहे, अशी माहिती सिटीप्राईडचे प्रमुख पुष्कराज चाफळकर यांनी दिली. तर दशक्रिया करमुक्त करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून तो प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आडमुठी भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली होती. तर कुठल्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करणारच यावर दिग्दर्शक संदीप पाटील ठाम होते, त्याप्रमाणे पुण्यासह राज्यभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पुरोगामी विचारांकडे नेणारा चित्रपट असल्याने विद्यार्थीवर्गात या चित्रपटाविषयी आकर्षण आहे.
ब्राह्मण महासंघ मात्र माघार घेण्यास तयार नाही. तयार व्हा मंडळी आज एकजूट दाखवून द्या सर्वांनाची आणि जे आपल्यावर खोटे आरोप करतात त्यांना हिंदू काय ते दाखवाच, अशी भूमिका घेतली आहे. प्रभात थिएटरसमोर आंदोलन करणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे. दुसरीकडे सिटीप्राइड आर डेक्कनला साडे तीनचा खेळ सुरू करण्यात आला आहे. गर्दी कमी आहे पण शनिवार, रविवार वाढेल, असा अंदाज पुष्कराज चाफळकर यांनी व्यक्त केला आहे.पुस्तकाची पार्श्वभूमी असल्याने चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरी वर आधारित हा चित्रपट असून, संदीप पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, राहुल सोलापुरकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्याने त्यातील आक्षेपार्ह मुद्यांवरच ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. परंतु त्यांचा विरोध समाजाला कर्मकांडात अडकवणारा आहे. ब्राह्मणी कर्मकांडाला विरोध म्हणजे 'हिंदू धर्माला' होत नाही. महासंघाचा उद्देश 'अंधश्रध्दा पसरवणारा आहे. परंतु सर्व समाजातून अंधश्रध्दा संपली पाहिजे...! हे अंतिम सत्य आहे. आगोदर चित्रपट पहा. 'दशक्रिया' चित्रपट कसा आहे हे पाहणारे सर्व लोक ठरवतील...सामाजिक प्रबोधनासाठी दशक्रिया चित्रपटासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका संतोष शिंदे यांनी मांडली.