जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये दसरा उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. पारंपरिक रमणाभेट व नगरप्रदक्षिणेसाठी खंडेरायाचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजता गडकोटावरून प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती मानकरी पेशवे यांनी दिली.जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. या वेळी मानकरी पेशवे, खांदेकरी, मानकरी मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक गणेश आगलावे, सचिव कुदळे, राजाभाऊ खाडे, काळुराम थोरात, खंडेराव काकडे, रमेश राऊत, नामदेव जगताप, अरुण खोमणे आदी उपस्थित होते.खंडोबादेवाच्या स्वारींचा पालखी सोहळा गडकोटावरून सायंकाळी ६ वाजता प्रस्थान ठेवणार असून रात्री २ ते २ :३० च्यादरम्यान ‘रमणा’ परिसरात भेट सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर जुनी जेजुरी-रोकडोबा मंदिरमार्गे नगरपालिका चौकमार्गे महाद्वार रोडने नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत बुधवारी (दि. १२) सकाळी पालखी सोहळा गडावर दाखल होऊन सकाळी ८ ते ९ या वेळेत ‘मुशाहिरा’ (रोजमुरा) वाटप होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. दसरा उत्सव पालखी मार्गाची साफसफाई करण्यात आली आहे. आतषबाजीसाठी दारूगोळा आणला आहे. मध्यरात्री रमण्यात देवभेटीच्या कार्यक्रमाच्यावेळी भाविकांना चहापानाची सोय करण्यात आली आहे. खंडा स्पर्धेचेही नियोजन केल्याचे व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
जेजुरीनगरीमध्ये दसरा उत्सवाची तयारी
By admin | Published: October 10, 2016 2:14 AM