पुणे : कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली, तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाउंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कारही केला.
पुणे शहर, परिसर व आसपासच्या तालुक्यांत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे हिंदू व मुस्लीम स्वयंसेवक प्रामुख्याने मूळनिवासी मुस्लीम मंच (येरवडा), कैलास स्मशानभूमी कामगार गट, उम्मत संस्था व वैकुंठ स्मशानभूमीतील स्वरूपवर्धिनीचा गट यांच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहेत. या लोकांचा उचित गौरव व्हावा, या हेतूने धनश्री पाटील यांनी दुबईस्थित डॉ. दातार यांच्याशी संपर्क साधला. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. दातार यांनी कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या मागवून घेतल्या व त्यांचे वितरण हे स्वयंसेवक काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन करण्यात आले. याकामी मूळनिवासी मुस्लीम मंचचे सबीर शेख, कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव, उम्मत संस्थेचे जावेद खान व स्वरूपवर्धिनी संघाचे अविनाश धायरकर यांचे सहकार्य लाभले.
कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांच्या धैर्याला आणि सेवासमर्पिततेला तोड नाही. हे स्वयंसेवक जीव धोक्यात घालून रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. हे थोर काम आहे. असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास मी व माझा उद्योगसमूह कटिबद्ध राहील. - डॉ. धनंजय दातार