वानवडी : ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उंड्री-पिसोळी तसेच १२ वाड्यांसाठी १०० ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडचे अद्ययावत हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर उभारावे यासाठी उंड्रीतील ग्रामस्थ जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सध्या पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. उंड्री-पिसोळी तसेच १२ वाड्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या पाहता या भागात कोविड सेंटर उभारणे गरजेचे झाले आहे. या भागात एकही आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे येथील नागरिकांना कोंढवा तसेच पुणे शहरातील हॉस्पिटलमध्ये यावे लागते. वेळेवर उपचार होत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाकाळात तसेच भविष्याच्या दृष्टीने उंड्रीमध्ये सुसज्ज ऑक्सिजन व व्हेंटिलेटरसह १०० बेडचे हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर सुरू केल्यास या परिसरातील रुग्णांवर वेळीच उपचार होतील. तसेच शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असे भिंताडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. या वेळी अविनाश टकले, दादा कड, ओंकार होले उपस्थित होते.